• 10 December 2020

    गोधडी

    वळण

    5 257

    वळण

    भाळावर नाजुकशी टिकली गोंदता गोंदता एक शब्द तिच्या भाळी तिच्याही नकळत गोंदला गेला होता,'वळण 'त्यावेळी या शब्दाचा अर्थ तिलाही माहित नव्हता.

    पहिल्यांदा तिच्या कानावर वर तो शब्द पडला तेव्हा असेल ती चार-पाच वर्षाची. तिची आत्या तिच्या घरी आली होती आणि ही एवढीशी झिपरी पोरआत्याच्या मायेने सुखावून तिच्याशी लाडीगोडी लावत होती.बोलता-बोलता तिच्या केसातून हात फिरवत तिची आत्या बोलून गेली तिच्या आईला,' सांभाळ ग वहिनी, अगं पदरी मुलगी म्हणजे जळता निखारा! चांगलं वळण लाव हो तीला, नाहीतर उद्धार होईल सर्वांचा." त्यावेळी तिला वळण शब्दाचा अर्थ कळला नाही तरी त्या शब्दाची धास्ती मात्र घेतली तिनं.

    ती आणि तिचा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ दोघे बरोबरच वाढले .भाऊ खूप मस्ती करायचा .तिला वाटायचं आपणही झाडावर चढाव .विटी दांडू खेळावा ,पण तो खेळत राहायचा आणि ही घरात आईला मदत करत असायची मुलीच्या जातीला कामाचं वळण पाहिजे म्हणून.

    इतकेच नव्हे तर केसांच्या वळणाचे तेच. नुकतीच वयात येणारी ती कुठेतरी पाहिलेली केशरचना करू लागली की मग आईचा किंवा आजीचा पाठीत धपाटा. केसांचा मधोमध भांग पाडून सरळ वळण घेत बांधलेला गच्च एक शेपटा .पेडाची वेणी ,चटई वेणी पण वळण तेच सरळ तिला आवडायचं नाही. ती कुरकुरली की आजी सांगायची," अगं मुलींच्या केसांच्या वळणावरून मुलीचं घरचं वळण कळतं."

    कचनारे ते वेणीचे बंध तिला रुतत रहात. सासरी गेली आणि मग त्या इतक्या माणसांच्या घरात अनेक नाती सांभाळावी लागली .तिने कसोशीने सांभाळली पण कधी असह्य होऊन एखादा शब्द तोंडातून हे गेला की लगेच आहेर मिळायचा ,"आईने वळण कसं ते लावलच नाही." म्हणून अगदी हे वळण अगदी नागिनी सारखं वेढा घालून बसलंय आपल्या तनामनावर असं वाटून जायचं तिला.

    स्वतःच्या मुलीला हे मनीमानसी रुजलेलं वळण लावण्याचा तिने प्रयत्न केला. लेकींनंथोडफार काही घेतल्यासारखे दाखवलं आणि ते नको त्याचा जाहीर निषेध केला .तिन तक्रार करताच नवऱ्याने हसत म्हटलं ,"अगं काळ बदलला तसं वळण बदललं ,"या नव्या बदलांने ती संभ्रमित झाली .तिन लेकीकडे नव्याने पाहिलं .तिचा तो मुक्त केशसंभार तिला मोहवून गेला .त्यात ती स्वतःला शोधत राहिली पण कशी सापडणार ती तिला! ते वळण खूपच मागं पडलं होतं आणि आयुष्याची मळलेली पाऊलवाट तिच्या अंगवळणी पडली होती .ते वळण तिच्या आवाक्याबाहेरचं होतं.

    तिन मग त्याकडे निग्रहाने पाठ फिरवली आणि ती वाटचाल करू लागली. नेहमीसारखीच एका सरळ रेषेत आणि मग ते वळण तिच्या ध्यानी मनी नसताना पुढे ठाकलं .यापुढे काय हे तिचं तिलाही माहित नव्हतं .आयुष्याच्या भगभगीत अर्थहीन उजेडाच वळण.तिचा जिवलग एका वेगळ्या वाटेने गेला होता. पाखरांना पंख आले होते आणि ती उडून गेली होती करण्यासारखं काहीच नव्हतं. सांगण्यासारखं खूप होतं पण ती ऐकणार्‍याला म्हातारीची बडबड वाटत होती.मग एकाएकी ती अंतर्मुख झाली. वाणीला लगाम घातला .आलेला उमाळा मनातच दाबला. मन ईश्वरचरणी गुंतवलं. आणि म्हणत राहिली ,

    'पडिले वळण इंद्रिया सकळा

    भाव तो वेगळा नाही मनी'

    तनामनाचे वळण एक झाले .त्यांची परमेश्वराशी सायुज्यता साधली आणि हे आयुष्याचं वळण मात्र तिला असीम समाधान देऊन गेलं

    रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई



    Rekha Mirajkar


Your Rating
blank-star-rating
Snehmanjari Bhagwat - (10 December 2020) 5

0 0

Kalpana Kulkarni - (10 December 2020) 5

0 2

Anupriya Bhand - (10 December 2020) 5
सुन्दर मर्मस्पर्शी रचना

0 0

ऋचा दीपक कर्पे - (10 December 2020) 5
अप्रतिम लिखाण.....

0 0