• 08 February 2021

    काहीतरी छानसं

    परिक्रमेला एक अनुभव

    5 122

    भालोद च्या प्रतापे महारांजाकडे मी असतानाची गोष्ट तुम्हाला मागच्या भागात सांगत होते. मी आणि महाराज भाजी घ्यायला निघालो होतो. ते पुढे आणि मी मागे. आता महाराज काय बोलतात आणि काय सांगातात याची मी वाट बघत होते. माझ्या मनात विचार आला, किती साधना असेल न महाराजांची, पण *साधना म्हणजे नक्की काय?* म्हणजे करायचं काय नेमकं? माझ्या मनात विचार आला आणि महाराज बोलू लागले, म्हणाले “तू मांजरीचं पिलू पाहिलयस का?” मी म्हंटलं हो, बघितलय, “आणि माकडाचं?” प्रतापे महाराजांनी मला विचारलं.. हो ते पण पाहिलय मी, पण त्यांचं काय..”बरं मग आता मला सांग कुणाचं पिलू जास्त सुरक्षीत असतं बरं, आणि का?”.. मी थोडा विचार करू लागले तोच प्रतापे महाराजांनी उत्तर दिलं, “मांजरीचं, कारण मांजरीच्या पिलाला आई तोंडात उचलून घेऊन जाते. या ऊलट माकडीणीचं पिलू बघ. त्याने आपल्या आईला घट्ट धरून ठेवलं असतं. म्हणजे समजा एका झाडावरून दुसरी कडे उडी मारताना ह्या पिलाने आईला धरलेला हात सुटला तर पिलू खाली पडेल नाही का, इतक्या उंचीवरून पडल्यामुळे त्याचा कदाचित कपाळमोक्ष ही होईल. पण मांजरीच्या पिलाला आई तोंडात घेऊन जात असते. पिलाला काहिही करावं लागत नाही. ते आपलं आरामात इकडे तिकडे बघत असतं. याऊलट माकडीणीचं पिलू भेदरलेलं असतं, ते जीवाचे हात करून आईला धरत असतं... बेटा, आपण मांजरीचं पिलू बनायचं माकडीणीचं नाही. म्हणजे काय करायचं माहितीये? आपली माऊली, आपली गुरुमाऊली सांगेल तितकच करायचं, काळजी करण्याची गरज नाही. आपण फ़क्त आपल्याला स्वत:ला त्या माऊलीच्या स्वाधीन करायचय. आपण कुठे जातोय, का जातोय, हे बघण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला म्हणून काहीही धरून ठेवण्याची गरज नाही. आपण आपल्याला त्या माऊलीच्या स्वाधीन केलं म्हणजे पुढचं सगळं ती बघते, आणि हो, इथे हात सुटायची अजिबात भिती नसते, कारण आपण हात धरलेलाच नसतो. तुझ्या गुरुंनी तुला काय संगितलय ते कर, बाकी साधना काय; कशी याचा विचार करू नकोस...ते सगळं तुझे गुरू तुझ्याकडून करवून घेतीलच” साधना कशी करायची याचं सरळ साधं उत्तर मला प्रतापे महाराजांनी समजवून सांगितलं... मला आता छान समजलय, साधना कशी करायची तर मांजराच्या पिलासारखी!
    आम्ही भाजी घेतली, सरस्वती मंदिरात जाऊन आलो.. सकाळी मला ज्या मंदिरात जावसं वाटत होतं तेच हे मंदिर. प्रतापे महाराज म्हणाले, “ खूप छान मंदिर आहे हे.. ही सरस्वती प्रसन्न झाली नं की ज्ञान आपोआप येतच..ते घ्यावं लागत नाही, फ़क्त ते तिनी प्रसन्न होऊन दिलं पाहिजे..” मला अचानक अन्नपूर्णा स्तोत्र आठवलं. ते माझ्या रोजच्या म्हणण्यात असतं म्हणून असेल, त्याची शेवटची ओळ फ़ारच खरी आणि अर्थपूर्ण आहे. अन्न म्हणजे खाद्य, पण कशाचं खाद्य याचा उलगडा या शेवटच्या ओळीत होतो. अन्नपूर्णा म्हणा, पार्वती म्हणा, देवी म्हणा.. सर्व शक्तीचीच रूपं..आणि या स्तोत्रात दान मागितलेलं आहे..
    *“भिक्षां देही कृपावलंबन करी, मतान्नपूर्णेश्वरी”* असं म्हणत या मातेला कृपेची भिक्षा मागीतली ती नेमकी कशासाठी तर
    *“अन्नपूर्णे सदापूर्णे,* *शंकर प्राणवल्लभे*
    *ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम* *भिक्षां देही च पार्वते”*....
    तर ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा या शक्तीरूपानी आपल्याला द्यावी अशीच प्रार्थना त्या सरस्वती रूपी शक्तीला आणि वैराग्याची भिक्षा मोक्षदाईनी, पापनाशीनी, वैराग्यदायीनी नर्मदेला करून आम्ही पुन्हा आश्रमात जाण्यासाठी निघालो.
    चालता चालता प्रतापे महाराज पुन्हा बोलू लागले. म्हणाले *“तू लहान मूल आणि आई यांचं नीट निरिक्षण केलेय का?* आई ला खूप कामं असतात त्यावेळी आई आपल्या तान्ह्या बाळा ला खाली ठेवते आणि बाळ रडू लागतं. पण आईला कामं असतात, मग त्याचं मन रमावं म्हणून आई त्या बाळाला खेळणी देते, बाळ रमतं थोडा वेळ, मग पुन्हा रडू लागतं. मग आई बाळाला थोडे मुरमुरे किंवा असच काहीसं देतं, तेव्हा ही ते रमून जातं, मग रडलं की आई कणकीचा गोळा देते त्या बाळाला खेळायला... मग बाळ पुन्हा रमतं...मात्र एक वेळ अशी येते की जेव्हा आई त्या बाळाला कशातच रमवून ठेवू शकत नाही. तीला त्या बाळाला उचलून घ्यावच लागतं.बेटा थोडी फ़ार साधना,जप केला की आपल्याला समाधान वाटू लागतं,आपण आपल्या आईच्या जवळ आहे असं वाटू लागतं. हे थोड्यावेळेचं समाधान म्हणजे आई नी आपलं मन रमण्यासाठी दिलेल्या खेळण्यांपैकी एक आहे. एकदा त्यातून बाहेर पडलं की मग येते सिद्धी किंवा तत्सम खेळण्यांची वेळ. त्यावेळी आपण आईच्या जवळ आहोत म्हणून आपल्याला अमुक तमुक सिद्धी प्राप्त झाल्या आहेत असं साधकाला वाटू लागतं...तेही एक खेळणं च असतं... मूळात साधक आई हून दूर असतो. मग त्यानंतर येते कणकेच्या गोळ्याची वेळ, ’आपण जणू या विश्वाचा रचैताच आहोत’ या भावनेनी ते लहान मूल कणकेच्या गोळ्यातून वेगवेगळ्या वस्तूंना आकार देत असतं, तसाच प्रकार साधकाचा होतो, मात्र ज्या वेळी ह्या सगळ्यात मन रमत नाही आणि आता कुठलही खेळणं, इच्छा माणसाच्या मनाला मोहवू शकत नाही त्या वेळी ती आई आपल्याला तिचा सहवास घडवून आणते. यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आईने बाळाला जरी दूर ठेवळ असतं तरी तीचं लक्ष त्याच्याकडे असतच.. ती त्याला पडू झडू देत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? कुठल्याही गोष्टीत मन रमू न देता तीचा धावा करायचा आहे, कशातही न रमणारं मूल कायम जेव्हा “आई मला कडेवर घे” ही एकच मागणी शांतपणे, आईला त्रास न होवू देता, पण सातत्यानी आईकडे करेल त्या बाळा बद्दल आईच्या मनात लवकर करुणा उत्पन्न होईल आणि कशातही न रमणा-या बाळाला आई चटक उचलून कवेत घेईल.”*
    प्रतापे महाराज बोलत होते आणि मी ऐकत होते. किती साध्या शब्दात आणि मला समजेल अशा भाषेत महाराजांनी किती मोठी गोष्ट सांगीतली होती



    Suruchi Naik


Your Rating
blank-star-rating
जया गाडगे - (08 February 2021) 5
नेहमीप्रमाणे सुंदर लेखन !

0 0

Seema Puranik - (08 February 2021) 5
🙏🙏

1 0

Veena Kantute - (08 February 2021) 5
सुरूची खूप भाग्यवान आहेस. किती ज्ञानवंतांचा सहवास मिळाला, अनुग्रह मिळवलास आणि ते वाचकांपर्यंत पोहचवण्याची क्षमताही कमाविलीस. तुझे अभिनंदन. 👍

1 0

Shanta Lagu - (08 February 2021) 5
सुरुची खूपच छान लिहिले आहेस.

1 0

Rekha Mirajkar - (08 February 2021) 5
डोंगराएवढी गोष्ट साध्या सोप्या शब्दात

1 0

ऋचा दीपक कर्पे - (08 February 2021) 5
खूपच सुंदर अनुभव...दोन्ही उदाहरणे भारावून टाकणारी.....

1 0