• 25 January 2021

    काहीतरी छानसं

    रामू

    5 47

    आज मी तुम्हाला एक खूप जुनी आठवण सांगणार आहे. इतकी जुनी की कदाचित ती मला कधीच आठवली नसती. मात्र कधीकधी आपलं मन अचानक पणे काळाच्या कुठल्यातरी खूप खालच्या पदरात जाऊन परत येतं. खरंतर असं प्रत्येका सोबतच होत असतं. कुणी आठवण म्हणून सोडून देतो, तर माझ्या सारखी एखादी व्यक्ती काही काळ का होईना त्या निघून गेलेल्या क्षणात थोडी तरी रमून जाते. ही आठवण खरंतर अजिबातच विशेष अशी आठवण नाही... पण ती आली त्यावेळेला माझे डोळे पाणावले होते.

    मी अगदी लहान असेल. पाच सात वर्षांचे. तेव्हाची ही आठवण आहे. हो एक सांगते हं, ईश्वर कृपेने माझी स्मरणशक्ती अतिशय चांगली आहे आणि मला त्या वयातलं देखील व्यवस्थित आठवतं. तेव्हाचं काय आठवतंय तुला असा काही प्रश्न विचारू नका, खरंच आठवतय म्हणून तर लिहितेय ! असो...

    मी ५-७ वर्षांची होते आणि तो १०-१२ वर्षांचा. आम्ही खूप खेळायचो. तो म्हणजे माझा अगदी खास मित्र. मी कधीही त्याला खेळायला बोलवलं तरी यायचा. त्यांनी कधी कधी म्हणून मला नाही म्हटलं नाही. तसा तो शांत स्वभावाचा आणि गुणी होता. अर्थात त्याचे गुण त्या वेळेला समजावे इतकी मी मोठी नव्हतेच. ते मला नंतर समजले... खूप नंतर. पण त्या वेळेला त्याचे धन्यवाद देण्यासाठी तो नव्हताच! तू कुठेतरी दूर निघून गेला होता. मीही हळूहळू त्याला विसरून गेले. अधेमध्ये विषय निघाला तर त्याची आठवण यायची पण ती देखील आम्ही जुन्या घरी राहात असेपर्यंत. आम्ही घर बदललं आणि त्याच्या आठवणींना जणू कुलूपच लागलं. असं असलं तरी कदाचित मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्याची आठवण एखाद्या वातीच्या टोकावर कणभर का होईना पण प्रदिप्त असलेल्या दिव्यासारखी तेवत राहिली असली पाहिजे. म्हणूनच माझ्या मनाच्या अतिशय आनंदी तरीही हळव्या क्षणी अचानक पणे त्याची आठवण वर आली.

    मी नर्मदा मैया चं दर्शन घेऊन इंदोरला परत येताना ची गोष्ट. जरा कंटाळलो होतो म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये चहा-कॉफी घेण्यासाठी थांबलो. इकडे तिकडे बघत कॉफीचे झुरके घेत घेत माझं लक्ष रस्त्याच्या पलीकडे गेलं. तिथे एका दुकानासमोर हा उभा होता. तो माझ्याच कडे बघत होता. त्याच्याकडे बघताक्षणी मी त्याला ओळखलं. तो आधी सारखाच दिसत होता, फक्त आता जरा धष्टपुष्ट झाला होता. खरं सांगायचं झालं तर, तो, तो निश्चित नव्हता! हा जो कोणी होता ना तो त्याच्यासारखाच दिसणारा कोणीतरी होता. आणि मला हे खात्रीने माहीत होतं. तरीसुद्धा, माझं मन अचानक त्याच्या आठवणीत गेलं.

    मला वाटलं आता उठावं इथून, त्याच्याजवळ जावं त्याच्याशी बोलावं, पण तो मोह टाळला मी, आणि पुन्हा कॉफी पिऊ लागले. थोड्यावेळाने तोच रस्ता ओलांडून माझ्यापर्यंत आला. मी दुकानाच्या बाहेर लावलेल्या टेबल वर बसले होते. गाड्या पार्क करतात तिथेच, रस्त्यावरच आणि माझ्याच गाडीजवळ तो जाऊन उभा राहिला. आता मात्र मला राहवलं नाही. मी पार्ले जी चा एक पुडा घेतला, आणि माझ्या गाडीच्या दिशेने गेले.

    " रामू, ए, तू रामू आहेस ना? मघाचपासून बघतेय मी तुझ्याकडे. आधी मला वाटलं की तू माझा रामू नाही...पण तू हा‌ रस्ता ओलांडुनी येऊन येथे उभा राहिला, तेव्हा मात्र वाटलं की तू दुसरा कोणी नाहीच... माझा रामूच आहे! तू इतके दिवस कुठे होतास हे मी तुला विचारणार नाही. इतके दिवस म्हणजे.... 35 वर्ष रे जवळजवळ... ! मी लहान होते तेव्हाच मला कळालं होतं तू कुठे गेलायस ते... पण तू असा अचानक भेटशील असं वाटलंच नाही मला!

    तुझी आठवण येण्याचं तसं काही कारणच नव्हतं. हो माझं बालपण विशेषतः ती वर्ष तुझ्या शिवाय अपूर्ण आहेत हे खरे, पण आता, 35 वर्षांनी तू असा अचानक समोर यावास, आणि जुन्या आठवणींनी माझे डोळे ओले व्हावे, असं का घडावं‌ रे? का तुझं आता येणं हे फक्त मला त्या काळात ढकलण्यासाठी होतं? का तुझी माझी एक भेट उरली होती असं समजायचं? कारण तू दिसला नाहीस तेव्हा काही दिवस बेचैन होते मी. मग घरच्या मोठ्यांनी समजवलं आणि शांत झाले....

    ते म्हणाले " आपल्या रामूला देवबाप्पा नी नेलं, आता तो परत नाही येणार..." खूप वाईट वाटलं होतं तेव्हा... कारण तू माझा सगळ्यात जवळचा मित्र होतास... मी जरी लहान होते, तरी तू मोठा होतास. मी अबोध होते, पण तू समजूतदार होतास... माझं बालवय होतं, मात्र तुझं उतार वय होतं! तेव्हा मला शेजारचा दादा म्हणाला होता; अगं बारा वर्षाचा होता आपला रामू... यांच्यात एवढच आयुष्य असतं. म्हातारा झाला होता तो!

    मला आठवतंय, तुझ्या त्या उतारवयात सुद्धा, तुझ्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळलेय मी, पण तू कधीच थकला नाहीस मला खेळवताना. तसा आमच्यापैकी कोणाकडेच तुझा मालकीहक्क म्हणून नव्हता, पण आमचं सगळ्यांचं तुझ्यावर आणि तुझं आमच्यावर जीवापाड प्रेम होतं. तुला बिना पट्याचा ठेवायचं नाही असा आम्हा मुलांचा हट्ट असायचा.... तुला गाडीवाले उचलून नेऊ नये म्हणून! हे सगळं कुठेतरी खोल दबलं होतं रे... आज तुला पाहिलं आणि आलं उफाळून सगळं!

    एक सांगू, तुझ्या गळ्यावर जो पांढ-या केसांचा पट्टा आहे ना, चंद्रकोरीसारखा, त्याचं लहानपणापासूनच अप्रूप वाटायचं मला. आजही खरंतर त्या पट्ट्या मुळेच मी तुला ओळखलं. आणि हो तुझ्या डोळ्यातले माझ्यासाठी चे भाव मला शब्दात आणि फोटोत व्यक्त नाही करता येणार... पण वाचता मात्र आलेत.. जसं मी तुला ओळखलं आहे तसं तूही मला ओळखलंय हे समजलं... आता पुढची भेट आहे की नाही माहित नाही.... आठवण मात्र नक्की आहे.
    ए चल, तू आधी बिस्कीट खा बरं.. बघ तुझ्यासाठी घेतलय मी. आणि हो, जिथे कुठे असशील ना तिथे आनंदात राहा. रस्ता सांभाळून क्रॉस करत जा बरं... तू भेटलास बरं वाटलं.. पण मला तुला घरी नाही नेता येणार... बघ ना किती दूर आलेय माझ्या घरापासून, आणि ईश्वराने आपली भेट करवली तेव्हा आभार मानू त्याचे... उगाच त्याच्या कामात लुडबुड कशाला करायची? तू जर इथेच जवळपास राहत असशील नं तर भेट होईल की... मी या रस्त्यावरून नेहमीच जात असते. थांबेन इथे पुढच्या वेळी... आणि तू नर्मदामय्याच्या जवळच आहेस हे काय कमी आहे का... छान रहा हो आनंदात.. येते आता..

    त्याला कुरवाळत कुरवाळत आमचा हा मुक संवाद घडला होता. इथे शब्दांना वाचा नव्हती, आणि अश्रूंना माप नव्हतं... पण तो आधीपासूनच समजुतदार. मी न बोललेलं त्याला तेव्हाही कळायचं आणि आताही कळलं. त्यानी मला निरोप दिला तेव्हा त्याच्या डोळ्यात एक समाधानाचं स्मित होतं. तेच स्मित मी उचलून घेऊन घरी आले.

    35 वर्षानंतर आजही, आमचा रामू असा अचानक समोर यावा, त्यानेही जणू ओळख द्यावी, यामागचं कारण काही कळलं नाही. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात.

    सोबत रामू चा फोटो देते आहे.

    डॉ. सुरुचि अग्निहोत्री नाईक.



    Suruchi Naik


Your Rating
blank-star-rating
ऋचा दीपक कर्पे - (25 January 2021) 5

0 0