• 08 April 2021

    मन कस्तूरी

    वलयापलीकड़े!

    5 288

    वलयापलीकड़े!

    "अगं एवढी डॉक्टर न तू? मग काय दुपार भर फक्त डोकेदुखीमुळे झोपून होतीस?"

    मोठी बहिण बोलून गेली खरी, पण लहान बहिणीच्या शांत दृष्टिकड़े बघता, तिला अर्थ कळला.

    "नेहेमीच डॉक्टर नाही गं होता येत ताई! कधीतरी सर्वसामान्य मनुष्य होण्याची इच्छा होतेच!"

    डोकेदुखीवर कोणी चहासाठी विचारणे, मायेने केसात तेल चोळून देणे, निवांत झोप म्हणणे किंवा साधी विचारपूस करणे सुद्धा एखाद्या डॉक्टर झालेल्या व्यक्तिच्या भाग्यात नसावे का?

    हे आणिक कितीतरी दुसरे अर्थही तिच्या शांत दृष्टितून समोर येत गेले.

    आपल्या घरात एखादे वैशिष्ट्य असलेली व्यक्ति असली, कि आपण सार्वजनिक प्रयत्नांनी तिला कधी सर्वसामान्य आयुष्य नाही जगू द्यायचा ध्यासच घेत असतो. उत्तम चित्रकार असलेले, नृत्यकलेत प्रवीण असलेले, उत्कृष्ट लेखनकर्म करणारे, संगीत क्षेत्रात उच्चांक गाठलेले किंवा सामाजिक क्षेत्रात यशवंत झालेले काही आपल्याच घरचे उदाहरण बघावे! आपण नेहेमी त्यांना त्यांच्या वैशिष्ट्याच्या कोणातूनच बघतो.

    सामान्य लोकांपेक्षा थोड़े वेगळे गुणधर्म असलेले किंवा आपल्यात असलेल्या कलागुणांसोबत उत्तम न्याय करण्यात सक्षम असणारे आपले स्नेहीजन! खरं तर एक समाज म्हणून, कुटुंब म्हणून हे प्रतिभावंत आपली जास्तीची जवाबदारीच असतात. त्यांचा सांभाळ करुन, सहाय्य करुन एका अर्थी आपण समाजापर्यन्त त्यांची कला, व्यावसायिक गुण किंवा उत्तम कामगिरी पोचण्यासाठी मदतच करत असतो.

    तरी सुद्धा, या काहीशा विशिष्ट लोकांशी बोलतांना, वागताना आपण सामान्य नसतो. कधीतरी इतके जास्त जपतो, लक्ष ठेवतो किंवा गृहित धरतो त्यांना, कि ते एक मोकळा श्वास घेण्यासाठी आसुसलेले असतात.

    उत्तम चित्रकार असलेली स्त्री एखादे यशस्वी प्रदर्शन पूर्ण झाल्यावर घरी येते आणि तिच्या स्वागताला सज्ज असलेले कुटुंबीय, मनापासून तिचा सत्कार करत म्हणतात, ’रांगोळी तेवढ़ी नाही काढ़ली बरं! म्हटलं तुझ्या उत्कृष्ट रंगसंगतिपुढ़े आपल्या गावठी रेषा काहीतरीच दिसतील!’

    खरं तर तिला त्या गावठी रेषा बघायच्या असतात, कारण त्यात ती कला न बघता, तिच्या साठी असलेली हौस, प्रेम आणि आपुलकी बघत असते.

    एका उत्तम गायकाच्या लग्नात, ऎरव्ही पुढ़े असणारी सर्व मंडळी ऎन मंगळाष्टकांच्या वेळी विचित्र वागत होती. कोणी पुढ़ाकारच घेई ना. मग कळलं कि त्या उत्तम गायकापुढ़े आम्ही बेसूर, कालच झालेल्या दर्जेदार गायन कार्यक्रमापुढ़े कुठे आमच्या मंगळाष्टका लागणार....

    पण या ठिकाणी सूर, ताल हे महत्वाचे नव्हतेच मुळी. लग्न करायला फक्त एक गायक नाही, तर घरातला मुलगा उभा होता, त्याच्या गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याच्या आनंदी सोहळ्यात भावना महत्वाच्या होत्या.

    असल्या सर्व व्यक्तिंच्या भोवती विशिष्टपणाचं एक वलय असतं. त्या वलयात असते त्यांची साधना, त्यांना विशिष्ट करणारे गुण, प्रतिभा आणि त्याबळावर मिळवलेले यश, कीर्ति आणि एक वेगळीच दृष्टि. आपापल्या क्षेत्रात वावरत असतांना हे वलय अधिकच प्रकाशमान होत असतं आणि ती त्यांची गरज सुद्धा असते. कधीतरी या वलयाच्या प्रकाशाचा झोत आपल्यावरही पड़तो आणि आपल्या व्यक्तिच्या वैशिष्ट्यामुळे सामान्य असलेले आपण सुद्धा एखाद्याच्या सन्मानाचे पात्र होत असतो.

    हे खरं आहे कि घरात एखादा जागतिक पातळीचा अभिनेता, कलाकार, खेळाडू, व्यवसायी किंवा लेखक झाला किंवा झाली, तर ते घर सामान्य राहात नाही. लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोणापासून नातलगांचे व्यवहार बदलतात. कुठेतरी स्वार्थसिद्धिची डाळ शिजायला सुरु होते, तर कोणाचा तरी अहंकार दुखावत असतो, कोणी या परिस्थितिचाही शिढी म्हणून वापर करण्यात मागे राहात नाही. मनुष्य स्वत: विनम्र असूनही त्याच्या जवळपास असलेले लोकं त्याला सरळ राहू देत नाही.

    आणि या सगळ्या बदलत्या परिस्थितिचा आनंद घेत, यशाच्या शिखरावर पोचलेला तो मनुष्य एकटाच उरतो. तो शोधत असतो ती दृष्टि, जी एक मनुष्य म्हणून त्याला साद घालत असेल, आपुलकीची तीच जुनी चव ज्यांच्या व्यवहारात असेल, बोलण्यात निस्वार्थ आणि प्रेमळ भाव असतील आणि जे आपल्याला फक्त आपण त्यांचे आहोत म्हणून प्रेम करत असतील.

    माझ्या मते, कितीतरी विशिष्ट, प्रतिभावंत, कलाकार किंवा गुणीजन, शिखरावर जाण्याच्या या यात्रेत, मधल्या प्रवाहातच आपला तोल सांभाळू न शकल्यामुळे थांबतात. त्यांची प्रतिभा, गुण तेवढ़ेच असतात, मेहेनत घेण्याची आणि समर्पणाची तयारी सुद्धा तीच असते. पण त्यांच्या वलयापलीकड़े बघायला कोणीच नसतं, एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून त्यांना व्यवहार मिळत नाही. मग आतली सृजनशीलता एकतर उगाच फुगून अहंकाराच्या स्वरुपात दिसते किंवा पूर्णपणे शून्य होता सामाजिकतेचा बळी ठरते.

    यशस्वी होणे, शिखर गाठणे, स्वप्नपूर्ति... हा सर्व प्रकार मिळवल्यानंतरही एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून जगता येणे आणि जगू देणे, याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे. झेप घेतांना विश्रांति म्हणून घरट्यात आल्यावर त्या घराचेही आकाशच झालेले असेल, तर विश्रांति मिळत नाही आणि झेप सुद्धा मंदावते.

    म्हणून लक्ष ठेवा, आपल्या जवळपासच्या जगात एकदा वलयापलीकड़े डोकावून अवश्य बघा!

    - अंतरा करवड़े



    अंतरा करवड़े


Your Rating
blank-star-rating
ऋचा दीपक कर्पे - (13 April 2021) 5
आगदी खरं...... 100%

0 0

Seema Puranik - (08 April 2021) 5
🌹उत्तम

0 0

उज्वला कर्पे - (08 April 2021) 5

0 0

vasudha gadgil - (08 April 2021) 5
उत्कृष्ट , समाजाला एक वेगळी दृष्टि देणारा उत्तम लेख ! ह्या दृष्टिकोणातून लोकांनी शिखर गाठलेल्या लोकांना बघितले तर त्यांनाही आपुलकी , प्रेम मिळेल . मात्र घरातल्या लोकांची ही दृष्टी होणे साहजिकच आहे. मला वाटतं त्यातही कौतुक असावे. आपल्या ह्या उत्तम सदरासाठी मनःपूर्वक अभिनंदन!

0 0