• 08 March 2021

    काहीतरी छानसं

    नो साइड इफेक्ट थेरपी

    5 264

    सर्वप्रथम आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधून मी एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर मांडणार आहे. '

    टिशू सॉल्ट आणि स्त्रीचे आरोग्य'

    हा आपला आजचा विषय आहे.

    मागच्या भागामध्ये आपण नो साइड इफेक्ट थेरपीला प्रिव्हेन्शन थेरपी असं का म्हणतात हे बघितलं. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने टिशू सॉल्ट थेरपी महिलांना कशी उपयोगी आहे हे आपण पाहू.

    स्त्रीचे आरोग्य हा विषय ज्यावेळी मी मांडते त्यावेळी त्यात स्त्रीचे शारीरिक आरोग्य, स्त्रीचे मानसिक आरोग्य आणि स्त्रीचे भावनिक आरोग्य या तीनही गोष्टींचा मी समावेश करते. याला कारणही तितकच महत्त्वाचं आहे. स्त्री स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा अनेक शारीरिक बदलांना सामोरी जात असते. तिच्या शरीरामध्ये झालेल्या या बदलांचा परिणाम किंवा प्रभाव तिच्या मनावर देखील होत असतो त्याच प्रमाणे तिच्या शारीरिक आणि मानसिक बदलांचा परिणाम हा तिच्या भावनांवर होत असतो, आणि मुख्य म्हणजे हे असे सातत्याने घडत असते.

    एका स्त्रीच्या आयुष्याच्या अगदी सुरवातीच्या कालावधीमध्ये म्हणजेच ज्या वेळेला मुलगी वयात आली असं आपण म्हणतो त्यावेळेला तिच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. कारण यापुढे एक सक्षम आई होण्यासाठी ती तयार होत असते. मात्र ती खरोखर सक्षम आई होते आहे का हा विचार करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. एका सक्षम आईच्या पोटी येणारी पिढी हीच केवळ एक सक्षम पिढी असू शकेल.‌

    मग या वयात आलेल्या मुलीला सक्षम आई घडवण्यासाठी काय अडचणी येत असतील ते आपण बघू. शरीरात होणाऱ्या अनपेक्षित बदलांमुळे लहान वयातल्या या स्त्रीला एक वेगळ्या प्रकारचे कुतूहल स्वतःच्या शरीराबद्दल निर्माण होते. या कुतूहलाचा परिणाम तिच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या हॉर्मोन्स वर होत असतो. तिच्या शरीरात अनेक रासायनिक बदल घडून येत असतात ते या हॉर्मोन्स मुळेच. आपण आपल्या वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलींपेक्षा काहीतरी वेगळे आहोत, आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या मुली आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत, असं काहीसं या वयात आलेल्या मुलींना वाटत असतं. त्यामुळे बरेचदा एकलकोंडेपणा, चिडचिड, एका प्रकारची अव्यक्त निराशा अशा अनेक मानसिक अडचणींना या वयातली मुलगी सामोरी जात असते. इतकंच नाही तर या वयात शरीरात होणाऱ्या अनेक बदलांमुळे व मनात चालणाऱ्या या घडामोडींमुळे ही स्त्री शारीरिक व मानसिक दृष्टीने जरा थकलेलीच असते.

    म्हणजे एकीकडे ती सक्षम आई व्हावी म्हणुन आपल्याला प्रयत्न करावयाचे असतात मात्र दुसरीकडे तिच्यातील शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे किंवा ते बदल अजून संपूर्णपणे आत्मसात न करू शकल्यामुळे ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीने कमजोर होत असते. या कमजोरीचा परिणाम तिच्या शरीरातील पेशींवर देखील होतो. आता इथे येतो टिशू सॉल्ट चा रोल.

    मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात मधील पेशींमधून जर एखादं मिनरल कमी झालं, किंवा त्या मिनरल्स संतुलन बिघडलं तर शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होते हे आपण पाहिले आहे. मग या लहान वयातील स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या असंख्य बदलांमुळे, हे मिनरल्स चं संतुलन बरेचदा बिघडतं.‌ तिच्या खानपानावर सुद्धा या बदलांचा परिणाम होतोच. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या मिनरल्सचा योग्य पुरवठा या लहान वयातील स्त्रीला होणं आवश्यक असतं.‌

    आपण आपल्या देशात एनिमिया हे नाव ऐकतो. हे एनिमिया म्हणजे नक्की काय माहिती आहे का? शरीरात जेव्हा लोह या खनिजाची म्हणजेच आयरन या मिनरलची कमतरता एका विशिष्ट पातळीच्या ही खाली जाते व त्याचा परिणाम सरळ रक्तामधील हिमोग्लोबिन या तत्त्वावर होतो त्या स्थितीला आपण एनिमिया असं म्हणतो. वरपांगी पाहता आपल्याला असं वाटतं की ज्या मुलींना योग्य आहार मिळत नाही अशा मुलींनाच हा ऍनिमिया होत असला पाहिजे कारण आपण तर आपल्या घरी आपल्या मुलींना अगदी योग्य असा आहार देत असतो... पण सत्य जरा वेगळं आहे मंडळी! दोन हजार अठराच्या युनिसेफच्या भारतामधील एका सर्वेमध्ये असं आढळून आलेलं आहे की 12 ते 17 या वयोगटातील मुलींचा सर्वे केला असता वीस टक्के पेक्षा जास्त मुली या ऍनिमिक आढळून आल्या होत्या. त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अतिशय कमी आढळून आलं होतं. त्यातही शहरात राहणाऱ्या मुलींची संख्या जास्त होती.

    हे हिमोग्लोबिन म्हणजे नक्की काय आहे? तर शरीराच्या सर्व भागाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम हे हिमोग्लोबिन करत असतं. हे हिमोग्लोबिन शरीरात तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोह. म्हणजेच आपलं मिनरल सॉल्ट.

    मग आता सांगा, या वयातल्या मुलींना सातत्याने लोहयुक्त मिनरल सॉल्ट घेण्याची किती आवश्यकता आहे नाही का? अहो अगदी त्रास झाला म्हणजेच टिशू सॉल्ट घ्यायचे नसतात... तर आपण या थेरपी ला प्रिव्हेन्शन थेरपी म्हणतो.. त्रास होऊ नये यासाठी सुद्धा मिनरल सॉल्ट घेतली जातात.

    आता फक्त लोहयुक्त सॉल्टच आवश्यक असतात का? तर त्याचे उत्तर मी नाही असं देईन. त्यावेळेला त्या स्त्रीची शारिरीक, मानसिक आणि भावनिक अवस्था बघून मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम यापैकी कुठल्या सॉल्ट ची आणि कुठल्या पोटेन्सी च्या सॉल्ट ची त्या स्त्रीला गरज आहे हे ओळखणे खूप गरजेचं आहे. केवळ एवढंच नाही तर तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांसाठी सुद्धा टॉनिक म्हणून देखील काही सॉल्ट त्या त्या स्त्रीच्या गरजेनुसार तिला दिल्या गेले तर ते तिच्या एकंदर स्वस्थतेसाठी आवश्यकच आहे.

    थोडक्यात वयात येणाऱ्या स्त्रीच्या संपूर्ण आरोग्यासाठी टिशू सॉल्ट हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

    आता आपण स्त्री च्या पुढच्या बदलाकडे बघू. प्रजोत्पादनाचा स्त्रीच्या वयाचा कालावधी म्हणजे वय 21 ते वय 35. हा स्त्रीच्या उमेदीचा कालावधी असतो. या वयामध्ये ती आई होण्यासाठी संपूर्णपणे तयार झालेली असते. आई होते वेळी पुन्हा एकदा तिच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल घडून येतात. या बदलांबद्दल मला वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही कारण आपण या बदलांना स्त्रीचा पुनर्जन्म असं सुद्धा म्हणतो इतके हे बदल मोठे आणि ओळखण्याजोगे असतात. आई होण्याच्या कालावधीमध्ये स्त्रीच्या शारीरिक गरजा निश्चितच वाढलेल्या असतात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तिच्या शरीरात एक जीव वाढत असतो आणि गंमत म्हणजे या वाढणाऱ्या जिवाच्या गरजा देखील असतातच ना! कॅल्शियम डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी, विटामिन डी डेफिशियन्सी, हे अनेक प्रकार आपण ऐकून आहोत. आजकाल तर स्ट्रेस डायबिटीज, एन्झायटी, ऍनिमिया हेसुद्धा प्रकार आपण बघतो. या अशा डेफिशियन्सीज् ज्यामुळे अनेकदा गर्भपात झाल्याचे देखिल आपण ऐकले असेलच. अशा वेळी सुद्धा आपले टिशू सॉल्ट प्रिव्हेन्शन थेरपी म्हणून काम करतात.

    नो साइड इफेक्ट थेरपी असल्यामुळे या थेरपीचा उपयोग गर्भवती स्त्री पासून, तान्ह्या बाळापासून तर वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांसाठी करता येतो हे आपल्याला मी मागे सांगितलेच आहे.

    गर्भवती स्त्रियांच्या शारीरिक गरजा ज्याप्रमाणे वेगळ्या होतात त्याचप्रमाणे त्यांच्या मानसिक अवस्थेतही बदल झालेला असतो. आपण आपल्या बाळाचा सांभाळ व्यवस्थित रित्या करू शकू की नाही या एका मोठ्या स्ट्रेस खाली ही गर्भवती स्त्री वावरत असतेच. निदान पहिल्यांदा बाळंत होते वेळी तर हा एक मोठा स्ट्रेस असतो. मुलाचा जन्म ज्या वेळेस होतो त्या वेळी त्याच्या सोबतच त्याच्या आईचा देखील जन्म झालेला असतो हे विसरता कामा नये. म्हणजे गर्भवती अवस्थेमध्ये तर तिची मानसिक अवस्था वेगळी असतेच पण आई झाल्यावर सुद्धा तिचं सगळं लक्ष आपल्या बाळाकडे असतं. याचे दोन परिणाम होतात. पहिला म्हणजे अशा स्त्रिया स्वतः कडे संपूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही. आणि दुसरा म्हणजे तिच्या दुधावर पोसल्या जाणाऱ्या बाळाला सुद्धा संपूर्ण परिपूर्ण आहार मिळायला हवा तसा तो बरेचदा मीळू शकत नाही. आईचं स्वास्थ्य जर संपूर्ण रीतीने स्वस्थ नसेल तर बाळाचं स्वास्थ्य तरी संपूर्ण रीतीने स्वस्थ कसं राहील बरं? अशावेळी टिशू सॉल्ट अत्यंत उपयोगी ठरतात. बाळंतपणानंतर आलेली कमजोरी, केस गळणे, दृष्टी कमकुवत होणे अशा अनेक गोष्टींचा सामना ही नवीन आई करत असते. गंमत म्हणजे हे आपले टिशू सॉल्ट 'आफ्टर प्रेग्नेंसी इफेक्ट' अतिशय उत्तम रित्या सांभाळून घेतात.

    एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या टिशू सॉल्ट चं कार्य. तुमच्या शरीरात ज्या कुठल्या तत्त्वाची कमतरता झाली आहे ते तत्त्व भरून काढणं हेच तर टिशू सॉल्ट चं मुख्य कार्य आहे!

    आता आपण स्त्रीच्या आयुष्यातील तिसऱ्या बदलांच्या बाबतीत विचार करू. प्रजोत्पादनाच्या कालावधीच्या नंतरचा हा काळ. याला आपण पेरिमेनोपॉजल आणि मेनोपॉजल स्टेज असं म्हणतो. निसर्गाने आई होण्यासाठी शरीरात जे बदल घडवून आणले असतात त्यांची गरज आता संपलेली असते. आणि म्हणून निसर्ग आता पुन्हा एकदा स्त्रीमध्ये बदल घडवून आणत असतो. खरंतर प्रजोत्पादनाचा कालावधी हा स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सेफ कालावधी आहे. मासिक पाळी ही केवळ प्रजोत्पादनाचा एक भाग नसून स्त्रीच्या शरीराला दर महिन्यात प्रजोत्पादनासाठी योग्य रित्या तयार करण्याचा कालावधी आहे. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील अनावश्यक तत्व बाहेर फेकली जाऊन एक प्रकारे स्त्रीच्या शरीराची सर्व रीत्या स्वच्छता होत असते. याच स्वच्छते अंतर्गत अनेक रोगांसाठी ची प्रतिकारशक्ती सुद्धा स्त्रीमध्ये याच कालावधीत तयार होत असते. एक निरोगी आई तयार करण्यासाठी निसर्ग कायमच धडपडत असतो म्हणूनच मासिक पाळीला स्त्रीचं कवच असेही म्हटल्या जातं.

    आता जेव्हा प्रजोत्पादनाची गरजच संपलेली असते तेव्हा या स्वच्छतेची सुद्धा गरज उरत नाही. आणि म्हणूनच मासिक पाळी बंद होते वेळी किंवा बंद झाल्यावर स्त्रीचं सुरक्षा कवच ब-यापैकी कमकुवत झालेलं असतं. एकाअर्थी वृद्धापकाळाची सुरुवात देखील या स्टेजला म्हणता येईल. जसे मासिक पाळी सुरू होते वेळी लहान स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात तसेच मासिक पाळी बंद होते वेळीदेखील स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात. खरं सांगायचं झालं तर सुरुवातीचा कालावधी आणि आई होण्याचा कालावधी या दोन्ही कालावधी पेक्षा हा मासिक पाळी बंद होण्याचा कालावधी जास्त त्रासदायक असतो. याच्या मागे देखील एक कारण आहे. सुरुवातीला म्हणजे लहान वयात होणारे हे बदल पचवून घेण्याची त्या लहान स्त्रीची तयारी आणि नैसर्गिक गरज असते. प्रजोत्पादनाचा कालावधी तर उमेदीचा कालावधी असतो, मात्र हा शेवटचा बदल प्रत्येक स्त्रीला एका अव्यक्त असुरक्षित भावनेने ग्रासून टाकतो. अशा वेळी देखील शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलांच्या आघातामुळे स्त्री कमकुवत होते.

    इथे सुद्धा आपले टिशू सॉल्ट महत्त्वाचं कार्य करतात. या कालावधीमध्ये स्त्रीच्या शरीरातील पोटॅशियमचे आणि कॅल्शियमचे प्रमाण अचानक पणे कमी होते. मासिक पाळी ची व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी या दोन मिनरल्स ची आवश्यकता असल्यामुळे प्रजोत्पादनाच्या कालावधीमध्ये हे दोन मिनरल्स शरीरामध्ये आत्मसात केले जाण्याचे कार्य शरीर जोमाने करत असते मात्र आता मासिक पाळीच बंद होत असल्याकारणाने या दोन मिनरल्स ची देखील कमतरता स्त्रीच्या शरीराला होत असते. हे दोन मिनरल्स शरीरात कमी असण्याची स्त्रीला अजिबात सवय नसते. अशावेळी तिच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील बराच परिणाम होतो आणि त्याच मुळे तिच्या भावनिक आरोग्यावर देखील परिणाम होत असतो.

    या कालावधीमध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशियम या दोन मिनरल्स चे योग्य पोटेन्सी चे योग्य ते सॉल्ट मात्र चमत्कारिक प्रभाव दाखवतात.

    तर मंडळी टिशू सॉल्ट आणि स्त्रीचं आरोग्य या महत्त्वाच्या विषयावर आपण अगदी‌ थोडक्यात का होईना,‌पण बोललो आहोत. प्रिव्हेन्शन थेरपी म्हणून याचा उपयोग आपण आपल्या आया, ताया, मावश्या, काकू, आत्या, सख्या यांच्यासाठी जरूर करावा ही विनंती.

    डॉ. सुरूची अग्निहोत्री नाईक.





    Suruchi Naik


Your Rating
blank-star-rating
प्रांजली लेले - (10 March 2021) 5
खूपच छान माहिती दिलीत.

0 0

Varsha Sanjay - (08 March 2021) 5

0 0

Seema Puranik - (08 March 2021) 5
अगदी योग्य मार्गदर्शन, खूपच छान माहिती 🌹

0 0