• 23 April 2021

    ग्रंथश्रुति

    डोक्यावर टांगती तलवार

    5 172

    "डोक्यावर टांगती तलवार" ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, बोलताना वापरलीही असेल. ही "टांगती तलवार" आली कुठून याबद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि त्यानुसार चाचपणी सुरू केली. ग्रीक वाङमयातून आणि संस्कृतीमधून अनेक कथा, व्याख्या, संज्ञा इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये, संस्कृतींमध्ये आल्या आहेत. ही "टांगती तलवार" देखील मला एका ग्रीक कथेतच सापडली... "The Sword of Damocles". याच कथेतून मराठीमधली "डोक्यावर टांगती तलवार" ही म्हण आली असेल का?

    लोकमान्यतेनुसार "The Sword of Damocles" ही तत्कालिन सिसिलीचा राजा डायनोसिअस (द्वितीय) याच्या दरबारात राजाचा सल्लागार म्हणून काम करत असलेल्या डेमोक्लिसच्या आयुष्यात घडलेली एक (सत्य?) कथा आहे. साधारण 4th century BC मध्ये घडलेली ही कथा नंतर केवळ लोककथा म्हणूनच समाजात प्रचलित राहिली. पुढे 356–260 BC च्या दरम्यान टिमेअस या ग्रीक इतिहासकाराने सिसिलीचा इतिहास शब्दबध्द करत असताना कथेला शब्दरूप दिलं आणि "The Sword of Damocles" ग्रीकांचा एक ऐतिहासिक दस्तावेज़ बनली.

    या कथांमधला रोमांच आणि सहज सुंदर शब्दमांडणी कुठल्याही नाटककाराला मोहित करेल अशीच आहे. तत्कालिन प्रसिद्ध रोमन नाटककार, कथाकार आणि वक्ता सिसेरो याने या कथेला त्याच्या "टस्क्युलन डिस्प्युटेशन (Tusculan Disputations)" या पुस्तक-मालिकेत समाविष्ट केलं आणि आपल्या नाट्यपूर्ण वक्तृत्वशैलीने रसिकांपर्यंत पोहोचवलं. यातूनच ही कथा तत्कालिन युरोपिअन संस्कृतीमध्येही रूजली आणि मला वाटतं कदाचित त्यातूनच ब्रिटिशांच्या व्यापारी जहाजात बसून ही कथा भारतात आली असावी.

    तर कथा अशी, की...

    ---

    धाक दडपशाहीच्या बळावर सिराक्युस प्रांतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करून डायनोसिअस (द्वितीय) ने सत्ता काबिज केली आणि तो स्वघोषित राजा बनला. त्याने राज्यकारभाराचे सर्वाधिकार स्वतःच्या हाताताच ठेवत स्वतःचं एक-हाती सत्ताकेंद्र निर्माण केलं. डायनोसिअस (द्वितीय) अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष राजा होता. त्याची काम करण्याची पध्दत अतिशय साचेबध्द आणि शिस्तबध्द होती. वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून वेळप्रसंगी त्याला राज्यकारभारात मदत करण्यासाठी म्हणून त्याने त्या त्या विषयातले पारंगत लोक आपले सल्लागार म्हणून नेमले होते; त्यापैकीच एक होता डेमोक्लिस. डायनोसिअस त्याच्या या सल्लागारांचा अतिशय आदर करत असे; त्यांना कुठल्याही ऐहिकांची कमतरता जाणवणार नाही याची तो पुरेपूर काळजीही घेत असे. पण तरीही राजाच्या राजेशाही आयुष्याची सर या सल्लागारांच्या आयुष्याला कशी येणार?!

    स्वतः डेमोक्लिस राजाला अनेकदा म्हणत असे, "इतक्या कमी कालावधीत संपादन केलेलं यश, कीर्ती; राज्यात सुव्यवस्था आणि सुबत्ता; सर्व सुखसोयींनी युक्त असा हा आलिशान राजमहाल... तुमच्यासारखा भाग्यवान इतर कुणीही नाही". या राजेशाही ऐहिक सुखांना पाहून आतून मनातून महात्वाकांक्षी डेमोक्लिसला कायम राजाचा हेवा वाटत असे. त्याला वाटे, "खरंच, काय सुख आहे राजा होण्यात! राज्यकारभारात मदतीला सल्लागार मंडळ आहे, शत्रूच्या मनात धडकी भरेल असं सैन्य सांभाळायला आणि त्याची काळजी घ्यायला सेनाप्रमुखांची एक संपूर्ण फळी तैनात आहे, वेगवेगळ्या प्रांतांची देखभाल करायला स्थानिक पातळीवर अधिकारी नेमलेले आहेत. मग राजाला काम आहेच काय?! पृथ्वीवर स्वर्गाची अनुभूती देणारी गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे हा राजमुकूट."

    डेमोक्लिसच्या मनातली ही भावना त्याच्या डोळ्यात तरळलेली डायनोसिअसने अनेकदा पाहिली होती; या भावनेचं रूपांतर ईर्षेत होण्याआधी त्याचा बंदोबस्त करायला हवा असं डायनोसिअसने ठरवलं. त्याने डेमोक्लिसला त्याच्या राजकक्षात बोलावलं आणि सांगितलं, "तुला हे राजपद खूप हवं-हवंसं वाटतं ना? ठीक आहे. तू माझा खूप विश्वासू सेवक आहेस; तुझ्या या इच्छेखातर मी तुझ्यासाठी एक गोष्ट नक्कीच करू शकतो. तू एक दिवस या राज-सिंहासनावर बस आणि या राजपदाच्या सुखांचा उपभोग घेण्याची तुझी अनेक अनेक दिवसांची इच्छा जगून घे."

    हे ऐकून डेमोक्लिस तर खुषच झाला. त्याने लग्गेच या प्रस्तावाला स्वीकृती दिली; राजा उठला आणि त्याने आदेश दिला की राजमहालातलं सर्वोत्तम घडणावळीचं त्याचं आवडतं सिंहासन डेमोक्लिससाठी मांडण्यात यावं; त्यावर सर्वोत्तम भरतकाम आणि विणकामाची कलाकारी असलेला गालिचा अंथरण्यात यावा. सोनं, चांदीची चकचकीत भांडी त्याच्यासमोर मांडण्यात यावी आणि राजमहालातल्या सर्वात सुंदर सेविकांनी त्याच्या आजूबाजूला दिमतीसाठी उभं रहावं.

    डेमोक्लिस स्थानापन्न झाला. समोर उत्तमोत्तम पदार्थांची रेलचेल, आजूबाजूला डोळे दिपवून टाकेल असा श्रीमंती थाट! नजर जाईल तिथे जगातलं सर्वांग सुंदर ऐहिक सुख डेमोक्लिसच्या दिमतीला हजर होतं. आजूबाजूच्या राजेशाही सुखसोयींवरून त्याची नजर भिरभिरत सहज वर छताकडे गेली; त्याने वर पाहिलं आणि तो एकदम दचकलाच! एक प्रचंड मोठी दुधारी तलवार त्याच्या डोक्यावर टांगलेली होती... आणि तीही घोड्याच्या शेपटीच्या निव्वळ एका तंतूसमान केसाने! आत्ता पडेल की मग पडेल अशा अवस्थेत असलेली ती तलवार जराशी हवेची झुळूक आली तरी डेमोक्लिसच्या डोक्यावर हेलकावे घेत होती. डेमोक्लिस घाबरून डायनोसिअसला म्हणाला, "ही तलवार इथून काढून टाका; ही अशी डोक्यावर सतत टांगती तलवार घेऊन मी हे राजपदाचं सुख नाही उपभोगू शकत!".

    त्याला त्या टांगत्या तलवारीचं प्रयोजन एव्हाना लक्षात आलं होतं. त्याने राजाची माफी मागितली आणि या एक दिवसाच्या राजपदाच्या जबाबदारीतून त्याची तात्काळ मुक्तता करण्याची विनंती केली. राजमुकूटाबरोबर येणार्‍या जबाबदारीची आणि धोक्यांची "टांगती तलवार" त्याच्या मनातल्या राजाबद्दलच्या आणि राजपदाबद्दलच्या चुकीच्या समजूतींवर अचूक घाव घालून गेली होती.

    तर अशी ही मजेशीर रंजक कथा डोक्यावरच्या टांगत्या तलवारीची!

    ---

    ग्रीक वाङमयातल्या या अशा कथांनी नंतरच्या कालखंडात जगभरातल्या अनेक चित्रकारांना भुरळ पाडली. सन 1804 मध्ये Antoine Dubost या चित्रकाराने काढलेलं "द सोर्ड ऑफ डेमोक्लिस" हे अप्रतिम चित्र पहा...

    The Sword of Damocles - Painting by Antoine Dubost

    मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या (म्हणजे आत्ताचं छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय) सर दोराब टाटा गॅलरीमध्ये हे चित्र अगदी मध्यवर्ती ठिकाणी लावलेलं आहे. या गॅलरीमध्ये इतरही मोजकीच पण खूप सुरेख चित्र आहेत; पण हे चित्र प्रत्यक्षच पहायला हवं. काय अप्रतिम डिटेल्स आहेत??!! या चित्रातल्या डेमोक्लिसच्या पायाचा हा क्लोज-अप पहा...

    The Sword of Damocles - Painting by Antoine Dubost

    त्याच्या पायातल्या चपला, त्या चपलांचं अप्रतिम डिझाईन, पायाची नखं आणि त्वचा... आणि खाली अंथरलेल्या गालिच्यावरची कलाकारी!! इतके बारकावे??!! केवळ अप्रतिम!

    हीच कथा न‍ंतर १८१३ मध्ये रिचर्ड वेस्टॉल (Richard Westall) या प्रतिभावान इंग्लिश चित्रकाराने खूप अप्रतिम पध्दतीने कॅनव्हासवर उतरवली आहे.

    The Sword of Damocles - Painting by Richard Westall

    या चित्रात राजवैभवात असूनही डोक्यावरच्या टांगत्या तलवारीने चिंताग्रस्त असलेला डेमोक्लिस खूप छान चित्रित केला आहे. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. त्याचबरोबर आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सेवकाच्या चेहर्‍यावरचे काहीसे मिश्किल भावही खूप पाहण्यासारखे आहेत. इतरही काही चित्रकारांनी ही कथा कॅनव्हासवर उतरवली आहे, त्यापैकी Felix Auvray या चित्रकाराच‍ं चित्रही खूप पाहण्यासारखं आहे.

    The Sword of Damocles - Painting by Felix Auvray

    ---

    कथा आणि त्यातली पात्र वाचकांच्या मनावर वेगवेगळे संस्कार करून जातात. कधी कधी मूळ कथा काळाच्या प्रवाहात मागे पडते आणि त्यातली शिकवण वेगवेगळ्या भाषांचे, संस्कृतींचे अंगरखे परिधान करत लोकांच्या मनात, बोलीत जीवंत राहते. अशीच ही कथा: "द सोर्ड ऑफ डेमोक्लिस". सत्यकथा की कथाकाराचा कल्पनाविस्तार? जे असेल ते... कथा आणि त्यातली शिकवण छान आहे हे नक्की!

    ऋतुराज पतकी



    Ruturaaj Patki


Your Rating
blank-star-rating
Radhika Godbole - (29 April 2021) 5

0 0

अमोल केळकर - (26 April 2021) 5
छान माहिती

1 0

Seema Puranik - (23 April 2021) 5
तुमची जिज्ञासु आणि शोधक वृत्ती जबरदस्त आहे,त्यामुळे वाचकांना नेहमीच रंजक कथा संदर्भा सहित आणि सुंदर चित्रां सहित वाचायला ,बघायला आणि अनुभवायला देखील मिळते

1 0

उज्वला कर्पे - (23 April 2021) 5

1 0

ऋचा दीपक कर्पे - (23 April 2021) 5
खुप खुप रोचक!!! खरंच राजा होणे सोपे नव्हे!! सतत एक टांगती तलवार डोक्यावर असतेच! आजच्या कथेचे वर्तमान काळात काय महत्त्व आहे ते सांगण्याची गरज नव्हे. समझदार को इशारा काफी है

1 0

Veena Patki - (23 April 2021) 5
एक रंजक कथा ...पण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या उत्तम चित्रकारांनी अप्रतिम पेंटिंग काढून त्यातली शिकवण सुंदर दाखवली...... व्वा , मजा आली..

1 0