• 23 August 2021

    बीचवरल्या गोष्टी

    पदक

    5 331

    **पदक**

    ह्यावर्षीच्या टोकिओमधे होणाऱ्या ऑलिंपिक्समधे ती पदक आणणारच असा विश्वास अख्ख्या देशाला वाटू लागला होता. जिल्हा, राज्य, आंतरराज्य अशा सगळ्या पातळ्यांवर चमकदार कामगिरी करत गेल्यावर्षी काही ठराविक देशांमधे झालेल्या झोनल स्विमिंग कॉम्पिटिशनमधे तिनं सुवर्णपदक जिंकलं तसं सगळ्यांच्या आशाळभूत नजरा तिच्याकडं वळल्या होत्या. येत्या ऑलिंम्पिकमधे भारतासाठी हे एक पदक खात्रीशीर असेल अशी आशा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. त्या झोनल स्पर्धेनंतर तिचे आई-वडील, प्रशिक्षक, डाएटिशिअन अशा प्रत्येकानं आपापलं काम अगदी काटेकोरपणे करायला आणि तिच्या जिवापाड मेहनतीने मिळू शकणाऱ्या पदकातला आपापल्या प्रयत्नांचा वाटा हिरिरीनं उचलायला सुरुवात केली होती. दिवसरात्र सगळ्यांना देशासाठी मिळवून आणायच्या त्या पदकाचा जणू ध्यासच लागला होता.

    आज ओडाइबा बीचवर डोळ्यांसमोरचा तो अगदी निळाशार समुद्र पाणावल्या डोळ्यांनी न्याहाळताना अंकिताला इथवर येईपर्यंतचे ते सगळे क्षण आठवत होते आणि त्याचाशी समांतर अशा घडमोडीही तिच्या मनात सुरू होत्या. ज्यांच्या स्पर्धा पार पडल्या होत्या तो एक ग्रुप उद्या परतण्यापूर्वी आज त्यांना उतरवलेल्या ‘हारुमी’ गावापासून जवळ असलेल्या ह्या बीचवर आला होता. वेटलिफ्टिंगमधे रौप्यपदक मिळवलेल्या मीराबाई चानूचा म्हणजे टोकिओला येताना विमानात तिच्या शेजारच्याच सीटवर बसलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या, मोडकंतोडकं पण कानाला खूप गोड वाटणाऱ्या हिंदीत तिच्याशी संवाद साधणाऱ्या मीरादीदीचा आजच प्रसारित झालेला एक इंटरव्ह्यू इथं येतायेताच यूट्युबवर तिनं पाहिला. काही दिवसांच्या सहवासात कधीच ह्यातलं आपल्याला काहीच न बोललेल्या मीरादीदीचा तिला दीदीनं पदक मिळवलं तेव्हां वाटला त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त अभिमान वाटू लागला होता आणि त्याचसोबत कौतुकाची नशा चढून स्वत:मधे अलीकडे शिरकाव करू पाहाणाऱ्या एकारलेपणाविषयीची खंतही खूप गडदपणे मनात दाटून येत डोळ्यांतून वाहू लागली होती.

    अंकिताचं पूर्ण नाव पटकन आठवू नये इतकं ‘जलांकिता’ ह्याच नावानं अख्खा देश गेल्या दोन वर्षात तिला ओळखू लागला होता. गेल्या दोन वर्षांतली तिची कामगिरीही तशी होतीच. सगळीकडून नुसता कौतुकाचा वर्षाव होत होता. अगदी लहानपणापासून पहाटे उठून बाबा फोरव्हीलरमधून आपल्याला पोहायच्या प्रसिक्षणासाठी घेऊन जायचा. आपण उत्तम स्वीमर म्हणून नावारुपाला यावं हे खूप आधीपासूनच त्याचं स्वप्नच होतं. त्याला त्याची स्विमींग ही पॅशन म्हणावी तितकी नियमितपणे फॉलो करता आली नाही, हे त्याचं तरुण वयापासूनचं दु:ख होतं. आजोबांच्या अचानक खालावलेल्या तब्येतीपायी अजून डिग्री पूर्ण व्हायची असतानाही त्याला त्यांच्या बिझनेसचा प्रचंड डोलारा सांभाळावा लागला होता. त्याच्याकडं दुसरा काही पर्यायच नव्हता. एका इंटरस्टेट कॉम्पिटिशनला तो गेलेला असतानाच आजोबांना मॅसिव्ह हार्ट ऍटॅक आला आणि त्या प्रचंड तणावाखालीही रौप्यपदक जिंकून बाबा जो घरी आला तो बिझनेसच्या व्यापातच गुंतला. प्रचंड आवड म्हणून वेळ मिळेल तसं पोहणं त्यानं सुरू ठेवलं मात्र स्वीमर म्हणून नावारुपाला येण्याचं त्याचं स्वप्न तो प्रत्यक्षात उतरवू शकला नव्हता. कारण तेवढा वेळच आता त्याच्याकडं नव्हता.

    आपला जन्म झाला तेव्हां बाबाचा बिझनेसचा व्याप अगदी जोमातच होता, तरीही त्यानं दवाखान्यात आपल्याला पहिल्यांदा जवळ घेतलं त्याच क्षणी आईला सांगितलं की, आपल्याला कितीही श्रम पडूदेत मात्र आपली ही छोटीशी परी जलपरी व्हायला हवी. अगदी तान्ही होते तेव्हांच तो पोहायला जायचा त्यावेळी आईला आपल्याला घेऊन सोबत यायला लावायचा. त्यानं पाण्यात उडी घेतली की उसळून उंच उडणारं पाणी पाहाताना मी आनंदानं आवाज करायचे, टाळ्या पिटायचे असं तो अजूनही कौतुकानं सांगतो. तीच माझी पाण्याशी पहिली ओळख! तिथून पुढं जराशी मोठी होताहोता कधी त्यानं मला पाण्यात टाकलं आणि मी आज आपल्या देशासाठी पदक मिळवणाऱ्यांच्या आशावादी रांगेत येऊन बसले हे माझं मलाही कळलं नाही. माझं जगणं, माझा श्वासध्यास, माझं स्वप्न सगळं काही पाण्याशी जोडलं गेलं ते फक्त त्याच्यामुळं! कधीकधी तर बिझनेस असाईनमेंट्समुळं परगावांहून आणि परदेशांतूनही विमानप्रवास करून बाबा रात्रीअपरात्री घरी पोहोचायचा, मात्र सकाळी साडेपाचला ‘मी घेऊन जाते, तू झोप जरा’ असं आई म्हणाली तरीही हट्टानं स्वत: ड्राईव्ह करत मला स्वीमिंग टॅन्कला घेऊन जायचा आणि तिथून परतताना म्हणायचा, ‘आय फील सो रिलॅक्स्ड ऍन्ड हॅपी नाऊ... तुला पोहताना पाहिलं की त्याच लयदारपणानं माझ्यातून थकवा बाहेर पडून जातो बघ, पिल्ल्या!‘ त्याचं ते कौतुक आपल्यासाठी पदकासारखंच असायचं!

    बाबा कितीही दिवस कामानिमित्त फिरतीवर असला तरी माझं ट्रेनिंग, योग्य आहार रोजच्यारोज सुरू आहे ना ह्यावर त्याचा कटाक्ष असायचा. आईला रोज त्याला रिपोर्टिंग करावंच लागायचं. त्यानं उराशी बाळगलेलं स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठीची अफाट मेहनत घ्यायलाही तो कधीच विसरला नाही. आईचा खरंतर स्वीमिंगशी दूरान्वयानंही काही संबंध नव्हता. मात्र कॉलेजला असताना ती बाबाच्या प्रेमात पडली त्या क्षणापासून पूर्ण त्याची होऊन गेली आणि त्याची स्वप्नंही तिचीच होऊन गेली. प्रत्येक ठिकाणी यश मिळवलं की सगळं कौतुक झेलून घरी आल्यावर आई चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवून कानाशी बोटं मोडते तो क्षण आपल्याला कायमच सर्वात सुंदर वाटत आला आहे. सुरुवातीला बाबा फिरतीवर असताना आपण पहाटे उठायला कंटाळा करायचो तर आपल्या आईबाई चक्क बाबाला फोन लावायच्या आणि त्याचा आवाज ऐकला की आपण खाडकन जाग्या व्हायचो. आपण मिळवलेलं प्रत्येक यश हे खऱ्या अर्थानं आई-बाबांचंच! केवळ माझ्या प्रगतीसाठी त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं आहे. ह्यावेळी ऑलिंपिक संघात निवड झाल्यावर पेपरला मुलाखत देताना आपण अगदी टेचात सांगत होतो की, ‘ह्या क्षणासाठी मी खूप मन मारलं आहे. गेल्या काही वर्षांत तर सुट्टी, सणसमारंभ, नातेवाईकांकडचे लग्न-मुंज किंवा इतर कोणतेच समारंभ, मित्रमैत्रिणींसोबत फिरणं वगैरे गोष्टी मी विसरूनच गेले आहे. फक्त पोहणं पोहणं आणि पोहणं हे आणि इतकंच केलं. त्यामुळं निवड झाली हे कळल्यावर आनंदाचा धक्का वगैरे काही बसला नाही. इथवर येणं हे अपेक्षितच होतं.’

    मात्र खऱ्या अर्थानं संघर्ष काय असतो हे परवा तिची इव्हेंट झाल्यावर भारतात परतलेल्या मीरादीदीचा इंटरव्ह्यू पाहाताना आज जाणवलं. आपल्या प्रगतीसाठी आपल्या आई-बाबानंही प्रचंड मेहनत घेतली आहे आणि आपणही प्रामाणिक प्रयत्नांत कधीच कसूर केली नाही ह्यात शंकाच नाही. मात्र नशिबानं आपल्याला परिस्थितीची साथ होती. कोणतीही गोष्ट उपलब्ध होणं ही आपल्यासाठी फार मोठी आव्हानात्मक गोष्ट नव्हती. बाबाच्या बिझनेसमधल्या मेहनतीमुळं आपल्याला सगळं सहज उपलब्ध होत होतं. मात्र मीरादीदीला रोजच्या रोज अंडं खायला मिळणं ही साधी गोष्टही एक आव्हान होतं. फारशा सोयीही उपलब्ध नसलेल्या छोट्याशा गावातून प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्यासारखी घरची फोरव्हीलर उपलब्ध नव्हती की आई-बाबांचं सोबत येणं नव्हतं. आठवड्यातून दोनदा तरी तिला पोषक आहार मिळावा ह्यासाठी तिचे आईवडील कष्ट घेत होते. त्यावेळी ही मात्र जमेल त्या मार्गानं प्रशिक्षणाच्या ठिकाणी पोहोचून आपलं काम चोख पार पाडत होती. धन्य ते आईवडील आणि धन्य आपली मीरादीदी! अशा परिस्थितीतही आपल्या ध्येयपासून न ढळण्याची ताकद कुठून आणत असतील हे लोक!?

    एक गोष्ट मात्र आज आपल्याला कळतीये की, जी परिस्थिती त्यांना ही ताकद देते तीच परिस्थिती त्यांचे पाय जमिनीवर ठेवते, त्यांचं मन आभाळाएवढं विशाल करते, त्यांच्यातलं माणूसपण जिवंत ठेवते. तिला लिफ्ट देणाऱ्या ट्रकड्रायव्हर्सचा फूल ना फुलाची पाकळी म्हणून तिनं केलेला सत्कार पाहाताना आपल्याला अश्रू आवरत नव्हते. एखाद्या शिखरावर पोहोचताना ज्या पायऱ्यांनी आपलं वजन पेलत झीज सोसून आपल्याला पुढं जायचा मार्ग मोकळा करून दिला त्यांच्यावरही डोकं टेकायला विसरू नये हा केवढा उदात्त आणि जगणं शिकवणारा, समृद्ध करणारा, माणूसपण राखणारा विचार आहे! आपल्या मुलाखतीत आपण स्वत: मारलेलं मन सांगून मिरवलेल्या प्रौढीची, त्यावेळी आपण साधं आपल्या आईबाबाचं नाव घ्यायलाही विसरल्याची आता अंकिताला खूप शरम वाटू लागली होती. अगदी थोडक्यात पदक हुकल्यानंतरही जेवढं दु:ख झालं नव्हतं तेवढं दु:ख तिला ह्याक्षणी त्या आठवणीनं होत होतं. सेकंदाच्या शंभरपैकी चार भागांनी उशीर झाल्यानं अंकिताचं कास्यपदक हुकलं होतं. तरीही देशभर तिचं कौतुकच होत होतं. आजवर इथपर्यंत कुणीही पोहोचलं नव्हतं त्यामुळं तूही एकप्रकारे नवा इतिहास रचला आहेस अशा शब्दांत तिला गौरवलं गेलं होतं.

    भारताच्या पंतप्रधानांनी ह्यावेळी सगळ्याच खेळाडूंशी संपर्क साधला तसा तिच्याशी साधला तेव्हां तिला अश्रू अनावर झाले होते. त्यावेली ते म्हणाले होते, ‘बेटा, आप तो पूरी भारतीय टीम में सबसे छोटी है! अभी आपके पास और अच्छा इतिहास रचने का बहुत समय मौजूद है! आप रोना बंद कीजिये और वापस आके और प्यार से पानी से लगाव बढाने के सपने देखना शुरू कीजिये!’ अंकिताचा बाबाही तिला म्हणाला होता, ‘पिल्ल्या, अगं तिथवर जाणं हेच फार मोठं काम होतं. तो अनुभव घेणं ही पुढच्या यशाच्या वाटेवरची एक महत्वाची पायरी आहे. आत्ताच हार मानायची नाहीये. आता ह्या अनुभवानं जे काही शिकवलं आहे त्याचं सिंहावलोकन करायचं आणि परत आलीस की नव्या जोमानं कामाला लागायचं. आय ऍम नॉट ऍट ऑल सॅड, बट व्हेरी प्राऊड ऑफ यू, पिल्ल्या!’ तिच्या प्रशिक्षकांनीही तिचं कौतुकच केलं होतं कारण ह्या स्पर्धेतला तिचा परफॉर्मन्स हा त्यांना अपेक्षित होता त्याहूनही चांगल्या पातळीवरचा होता. तेही म्हणाले होते, ‘आता ह्याच मार्गानं पुढं जाऊन पुढच्या वेळी सुवर्णपदकच आणायचं! यू आर ऑन राईट ट्रॅक!’

    कालपासून हे सगळं मनात साठवत ती पुढच्या मेहनतीसाठी मनाशी खूणगाठ बांधत होती. मात्र आज दुपारी मीरादीदीचा इंटरव्ह्यू आणि बाकीचे व्हिडिओज आले ते पाहिल्यापासून तिच्या मनात काही विचारांच्या वेगवान लाटा सुरू झाल्या होत्या. आत्ता बीचवर शांतपणे बसल्याबसल्या वाहात्या डोळ्यांनी अंत:चक्षूंसमोर चलचित्रासारखा सगळाच पट पाहून होताहोता तिला आठवत होती, ‘तेरे को मेरी तरपसे बहुत सारा बेस्ट विशेस है अंकिता! अच्छा करना हां!’ असं निघताना प्रेमळपणे अगदी मनापासून म्हणणारी मीरादीदी... मीराबाई चानू! तिच्या डोळ्यांतला तो प्रेमळपणा, आवाजातला तो प्रामाणिकपणा तिच्या परिस्थितीनं तिला बहाल केला आहे हे अंकिताला ह्याक्षणी जाणवलं. जाणिवेच्या त्या पातळीवरच असताना तिच्या मनात एक विचार पक्का होत होता, ‘आपण तर आता पुढच्या ऑलिम्पिकसाठी अफाट मेहनत घ्यायचीच, मात्र बाबाला सांगायचं की अशा खऱ्या अर्थानं ध्येयवेड्या लोकांसाठीही आपल्याला जमेल ते करायचं. अशा काही जणांचा किमान दोन वेळच्या पोषक आहाराचा खर्च तर आपला बाबा नक्कीच करू शकेल!

    आपल्यात अहंकाराचा शिरकाव जाणवतो त्याक्षणी आपल्यावर इतकं जिवापाड प्रेम करणारा बाबा क्षणार्धात बदलून गेल्यासारखा होऊन ‘कधीही अशा फुकाच्या मस्तीत राहू नये. आपले पाय कायम जमिनीवर हवेत अंकिता, तरच आभाळाला गवसणी घालताना पडायची भीती उरत नाही’ असं म्हणतो. त्याला मी हा विचार सांगितला की तो नक्की म्हणेल, ‘पिल्ल्या, हे तुझ्या मनावर उमटलं आहे ना, ते किती देखणं पदक आहे बघ! खरंखुरं पदक तर भविष्यात आणायचं आहेच आपल्याला. मात्र हे मनावर कोरलं गेलेलं सुंदर पदक क्षणभरही नजरेआड होता कामा नये ह्याचीही काळजी घ्यायची!’ अंकिताच्या अंतर्मनाला तिच्या लाडक्या बाबाचा हा आवाज ऐकू येत होता. अहंभावानं लगडलेली काटेरी फांदी गळून पडल्याची आणि सुंदर विचारांचे काही कोवळे अंकुर मनोवृक्षाला फुटल्याची एक सुखावह जाणीव तिच्या मनभर वेढत चालली होती. त्या सुखाच्या आवेगात बीचवरची ओलसर वाळू तिनं एका हाताच्या मुठीत घट्ट पकडली आणि दुसऱ्या हातानं गालांवर ओघळणारे अश्रू टिपू लागली. त्यापुढचे काही क्षण कानांवर येणारी हलकीशी समुद्राची गाज ऐकत शांतावणारं तिचं मन मुठीतल्या वाळूच्या त्या गारसर स्पर्शानं अंगभर सळसळून गेलेली एक आनंदाची लहरही मिटल्या डोळ्यांनी अनुभवत होतं.

    © आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई



    आसावरी वाईकर


Your Rating
blank-star-rating
उज्वला कर्पे - (24 August 2021) 5
अतिशय सुरेख.

0 0

Seema Puranik - (24 August 2021) 5
सुंदर

0 0

Sonali Mulkalwar - (24 August 2021) 5

0 0

Gokul Deshpande - (24 August 2021) 5
आसावरी, एकदम भन्नाट लिहिलं आहेस. विषयाची निवड जबरदस्त...

0 0