• 06 September 2021

    बीचवरल्या गोष्टी

    बळ

    5 327

    **बळ**

    दोन वर्षांनी बहिणीबहिणी भेटल्या. पंधरवड्यापूर्वी परदेशातून भरतात परतलेलं सुनीचं कुटुंब जेटलॅग, मुलांच्या पूर्वीच्याच शाळेत ऍडमिशन, बंद घराची साफसफाई करून घेत गरजेचं सामान भरणं वगैरे गोष्टींत गुंतलं होतं. मात्र सुनीनं सगळं आवरेतोवर सोयीचं जावं म्हणून मुलांना आपल्या ताईकडं सोडल्यानं त्याबाबतीत ती निश्चिंत होती. सगळी कामं मार्गी लागली तशी चार दिवस सुनीही नवऱ्यासोबत दोन तासांवर राहाणाऱ्या ताईच्या घरी आली होती. आज सुट्टीचा दिवस असल्यानं ताई, तिचा नवरा-मुलं सगळेच जरा निवांत होते. जरा मोकळी हवा खाऊन येऊ म्हणून घरापासून वीसेक मिनिटांवर असलेल्या बीचवर सगळेजण आले होते. चौघं मुलं खेळात रमली होती. दोघं साडू मुलांकडं पाहात कसल्यातरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गोष्टींच्या चर्चेत गुंतले होते आणि दोघी बहिणींच्या निवांत पाय पसरून समुद्र डोळ्यांत साठवत काहीतरी गप्पा सुरू होत्या.

    मधेच एकदम काहीतरी जाणवून सुनीची ताई म्हणाली, ‘हॅलो, लक्ष कुठं आहे तुझं, सुने?’
    ‘कुठं काय, ताई! इथंच आहे की.’
    ‘मी काय बडबडले इतका वेळ ते शिरलं का तुझ्या कानात?’
    ‘हो ऐकतेय ना.. आणि सूर्य पण किती छान दिसतोय ना?’ सुनी आपल्याकडं वळलेली ताईची नजर टाळत म्हणाली.
    ‘माझा एकही शब्द शिरला नाहीये तुझ्या कानात. म्हणूनच तो विषय टाळण्यासाठी तुला सूर्य छान दिसतोय, सुने’ ताई खात्रीनंच म्हणाली.
    ‘ताई sssss, असं काही नाहीये गं.’
    ‘मग सांग बरं मी काय म्हटलं ते...’

    ‘सॉरी गं... लक्ष नव्हतं माझं. छान समुद्र, सूर्य, लाटा न्याहाळत होते मी. त्या नादात ऐकलं नाही मी काही’ शेवटी सुनीनं मान्य केलं.
    ‘नाही सुने, ते कारण नाहीये. काही तरी वेगळं सुरू आहे तुझ्या मनात. विचारांची खळबळ मजली आहे बहुतेक. फक्त तू नेमकेपणी काय आहे ते सांगत नाहीयेस’ ताई मात्र तिच्या मुद्द्यावर ठाम होती.
    ‘अगं, असं काहीच नाहीये ताई!’ सुनी ओठांवर हसू आणायचा प्रयत्न करत म्हणाली.
    ‘तुझा चेहरा आणि डोळे बघ. चेहऱ्यावर काळजी दिसतेय आणि डोळे बघ ओले झालेत. आता सांगू नको डोळ्यांत कचरा गेलाय म्हणून’ आता ताईनं थेटच म्हटलं.
    ‘ताई sssss’ असं म्हणताना मात्र खरंच सुनीचे डोळे पूर्ण भरून येतायेता एक अश्रू ओघळलाच.

    आपली ताई हे कायमच सुनीचं आधारस्थान होतं. लहानपणी आई-बाबा दोघंही नोकरी करायचे तेव्हापासून सुनीचं सगळं तिची ताईच बघायची. आई-बाबांवर घरच्या खूप जबाबदाऱ्या होत्या, शिवाय स्वत:च्या घराचं कर्ज होतं, मुलींचं शिक्षण होतं, त्यांच्या लग्नाची तजवीज करायची होती. ते दोघींना एकच सांगायचे की, ‘आम्ही कष्टाला कमी पडणार नाही आणि तुम्हीही कष्टांत कसूर करायची नाही. दोघी छान आपापल्या पायांवर उभ्या राहिलात की सगळ्याचं चीज होईल. आम्हाला तुमचा अभ्यास घेणं वगैरे शक्य नाही होणार, तेवढं आमचं शिक्षणही नाही. पण आम्हाला जगण्यानं एक शिकवलं आहे की, सचोटीनं मेहनत केली तर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळं तुम्ही त्यात कमी पडायचं नाही आणि जगण्यात सचोटी, प्रामाणिकपणा ह्या गोष्टी सोडायच्या नाहीत. मग परमेश्वर आपल्याला काही कमी पडू देत नाही की काहीही वाईट घडू देत नाही.’

    सुनीला नेहमी वाटायचं की, ‘आपल्या ताईचा आई-बाबांवर फार जीव आहे, त्यांच्याविषयी फारफार आदर आहे. ती मन लावून त्यांचं सगळं ऐकते, शिवाय त्यांना आपली कसली काळजी लागू नये म्हणून आपली आणि आपल्या अभ्यासाचीही काळजी घेते. आपण हूडपणा केला तर ताईसमोर आपली खैर नाही. पण नीट शहाण्यासारखं वागलो तर ताईसारखं कौतुकही कुणी करणार नाही.’ आई-बाबांची भीती नव्हती इतका सुनीला ताईचा धाक वाटायचा. पण पुढच्या आयुष्यात त्यावेळी लागलेल्या शिस्तीचं महत्त्व कळत गेलं.

    आपल्या आई-बाबांनी कसं सगळं शून्यातून उभं केलं आणि आपण काहीतरी करून दाखवलं तर त्याचं कसं चीज होईल, बाकी त्यांना आपल्याकडून काय हवंय. त्यांची किंमत आपण पैशात करूच शकत नाही की आपण कोटी रुपये त्यांना देऊन ते आनंदी होतील. आपण त्यांचे संस्कार जपून प्रामाणिक कष्टांनी यश मिळवत राहिलो तर तो त्यांचा सगळ्यात मोठा आनंद, समाधान असेल. त्यामुळं त्यांना आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल वगैरे गोष्टी ताई खूप तळमळीनं सुनीला सांगत राहायची. सुनीची काळजीही घ्यायची आणि तिला शिस्तही लावायची. ताईपासून काही लपवणं सुनीसाठी तसं महाकठीणच!

    आजही शेवटी डोळ्यांतून ओघळलेला अश्रू टिपत सुनी म्हणाली, ‘ताई, ह्या सगळ्या वातावरणात भीती वाटते गं कधीकधी फार. आपल्याकडून आपण काळजी घेतोय सगळी. पण उद्या काही झालंच आपल्याला तर मुलांचं कसं होईल असं मनात येऊन कासावीस होत राहातं.’ हे ऐकता ऐकता ताईच्या चेहऱ्यावर गांभीर्य पसरत चालल्याचं सुनीला दिसलं. आपण उगीचच हा विषय काढला का? असंही तिला वाटलं. तोवर तिची ताईच बोलू लागली, ‘सुने, खरं आहे गं. आपल्या हाती एरवीही काही नसतंच. पण ही परिस्थिती म्हणजे कसलं विचित्रच संकट आहे. जरा परिस्थिती सुधारतेय म्हणेतोवर पुन्हा ती बिघडत चालल्याच्या बातम्या यायला लागतात. कधी थांबणार आहे हे सगळं देवच जाणे! मलासुद्धा अलीकडं खूप भीती वाटायला लागली होती. एकदा तर मी ह्यांना म्हटलंही की,आर्थिक बाबी वगैरे एका वहीत सगळं नीट लिहून ठेवा तुम्ही. आपल्या दोघांना काही झालं तर मुलांना काहीतरी आधार राहील हाताशी. सज्ञान नाहीच आहेत ती अजून, पण कुणीतरी ही माहिती वाचून दोन पैसे आहेत ते वापरून काहीतरी मदत तरी करू शकेल.’

    ‘ताई, अगं, तुझी मुलं थोडीशी तरी मोठी आहेत गं. माझी तर बघ केवढीशी आहेत अजून. हे तर परवा म्हणाले की, मृत्युपत्र करून ठेवूया का आपण? आणि त्यात संपत्ती मुलाम्च्या नावे लिहून ठेवून त्यांचा सांभाळ करून त्यांच्म शिक्षण पुढं सुरु ठेवणाऱ्यालाही ठराविक काहीतरी रक्कम कृतज्ञतेचं मानाचं पान म्हणून मिळावं असंही नमूद करू. म्हणजे उद्या आपल्याला काही झालंच तर पोरं अगदीच निराधार तरी राहणार नाहीत. जे कोण पुढं काही व्यवस्था बघेल त्यांना निदान ठराविक मार्ग दिसेल आणि पोरांची अगदीच दिशाहीन अवस्था तरी होणार नाही. आयुष्य अगदीच भरकटणार तरी नाही’ सुनी हुंदका देत म्हणाली.

    सुनीच्या हुंदक्यानं मात्र तिची ताई एकदम सावध झाली आणि परत नेहमीच्या भूमिकेत शिरत म्हणाली, ‘सुने, बास आता असले फालतू विचार. तसंही काय आहे आपल्या हातात? पण म्हणून नको ते चित्र आपणच रंगवायचं का आपल्या डोळ्यांपुढं? आजवर इतक्या सगळ्या गदारोळात ‘त्यानं’च राखलं आहे ना आपल्याला? घेतली आहे ना आपली काळजी? प्रश्न निर्माण झाले तरी त्यातून अलगद ‘त्यानं’च काढलं ना बाहेर? ते कशामुळं? तर आई-बाबांनी शिकवलं तसा त्याच्यावर विश्वास ठेवत आलो म्हणूनच ना? मग आता तो विश्वास का डळमळीत होऊ द्यायचा? हे असे विचार आपण करतो तेव्हा ‘त्याला विसरतो’ असा त्याचा अर्थ होतो. तेव्हां तो विश्वास नाही ढळू द्यायचा, सुने.’

    वाक्य पूर्ण करताकरता उठून उभी राहात सुनीचा हात धरून तिलाही उठवत लाटांच्या दिशेनं घेऊन गेली. पावलांना गार पाण्याचा सुखावह स्पर्श झाला तसं मन स्वस्थावलं. मग परत ताईच पुढं बोलू लागली, ‘सुने, मागच्या वर्षी वाटत होतं की, आपण दोघी दोन देशात आहोत. आपली भेट तरी आता होतेय की नाही? पण झाली ना भेट? तिकडून तुमच्या परतीची सगळी व्यवस्था कंपनीकडून होऊन तुम्ही सुखरूप पोहोचलात ना इथं? ही सगळी ‘त्याची’च कृपा म्हणायची बघ! इतकं सगळं चांगलं वाट्याला येत असूनही आपण ना नको ते विचार डोक्यात घेऊन बसतो. एकदम मनात आलं बघ सुने की, हा कुठंतरी ‘त्याचा’ अवमानच आहे गं. नको आपण असले अनावश्यक विचार करायला.’

    ‘खरंच गं ताई, पटतंय’ एक लाट पायांवर घेत सूर्यबिंबाच्या दिशेनं टक लवलेली सुनी म्हणाली.
    ताई पुढं म्हणली, ‘आपण आपल्याकडून हलगर्जीपणा करायचा नाही. आई-बाबांसारखं जमेल झेपेल तेवढं एकमेकांसाठी आणि इतरांसाठी करणंही सोडायचं नाही. ते प्रेमाचे लागेबांधेही आपल्याला बळ देत असतातच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्यातला ‘देव’ म्हणजे प्रामाणिकपणा ही आई-बाबांची शिकवण आणि तो देव दोन्हीही विसरायचं नाही. म्हणजे खरीखुरी देव नावाची ती परमशक्ती आपली काळजी घेतल्याशिवाय राहाणारच नाही गं! मग संकट कुठलं का असेना!? ‘त्याच्या’ आवाक्याबाहेरचं तर काहीच नाही ना! आजवर आई-बाबांच्या माघारीही परमेश्वरानंच तारलं आहे आपल्याला, सुने! तेव्हां ‘त्याचा’ अवमान न करता हृदयात त्याला ‘मानाचं स्थान’ दिलं ना की असले नाहक विचार जीव खाणार नाहीत बघ आपला!’

    ताईचा हात प्रेमानं घट्ट धरून ठेवत सुनी म्हणाली, ‘हो, आणि माझा हा देवही आहे की माझ्यासोबत मला तारणारा! माझ्या मनातलं त्याचं स्थान तर कायमच अबाधित आहे! गेली दोन वर्षं आपण दोघी दोन धृवांवर असतानाही माझ्या मनाचं बळ राखून ठेवायला फोनवर आणि एरवी माझ्या मनातही तूच तर होतीस, ताई!’
    ‘लहानपणी होतीस तशी कायमच येडपट राहाणार तू, सुने’ असं जरी तिची ताई हसत तिला म्हणाली तरी सुनीच्या प्रेमामुळं तिचे डोळेही पाणावले होते आणि तिला स्वत:च्या मनालाही बळकटी मिळाल्यासारखं वाटत होतंच.

    © आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई



    आसावरी वाईकर


Your Rating
blank-star-rating
Rucha Deepak Karpe - (06 October 2021) 5

0 0

उज्वला कर्पे - (30 September 2021) 5
खूपच छान.

0 0

Seema Puranik - (13 September 2021) 5
खूप छान

0 0

Pradip Raje - (08 September 2021) 5
खरं आहे ! परिस्थितीच अशी आहे कि असा विचार मनात येतो कधी कधी . अश्या घटनाहि ऐकल्यात अलीकडे़ .

0 0

M Veena Harne - (07 September 2021) 5

0 0

Veena Kantute - (07 September 2021) 5
खूपच छान आणि सद्यस्थितीत सकारात्मकता देणारी कथा. बऱ्याच दिवसांनी पुन्हा छानशी बीच वरच्या कथेने आनंद झाला.

0 0

वर्षा मेंढे - (07 September 2021) 5

0 0

View More