• 05 July 2021

    बीचवरल्या गोष्टी

    मात

    5 318

    **मात**

    नंदिनीच्या डोळ्यांतल्या पाण्याला खळच नव्हता... समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा वेग जास्ती कि नंदिनीच्या वाहात्या डोळ्यांचा वेग जास्ती हे ठरवणं अभयला कठीण जात होतं... त्यात समजूत घालण्यासाठी तिच्या रडण्याचं कारण तरी माहीत हवं... त्याचाही त्याला काहीच अंदाज नव्हता... तिच्या अशा कथीही, कुठेही अनावर डोळे भरून येण्याला तो अडगं हळवेपण म्हणायचा... कुठली गोष्ट बघून तिला काय आठवेल किंवा कुठल्या एखाद्या छोट्याशा घटनेचाही तिच्या मनावर काय परिणाम होईल आणि तिचे डोळे गच्च भरून येतील ह्याचा काही भरवसाच नसायचा...

    ‘काहीतरी घडल्यावर एखादी भावना अनावर होऊन माणसाला रडू येणं हे साहजिकच आहे, नंदिनी! ते समजून घेता येतं, त्या रडण्यात चूक असं काहीच नसतं कारण त्यामागचं कारण संयुक्तिक असतं. मात्र तुझं असं काही कारण नसताना रडत राहाणं माझ्या समजून घेण्याच्या कुवती पलीकडचं आहे’ असं तो हताशपणे तिला कितीदातरी म्हणाला होता... परंतु त्यामुळं काहीच बदललं नव्हतं, ना नंदिनीचं हळवं होणं, ना तिचं काही ठोस कारण सांगता न येणं, ना त्याचं हतबल होणं!... एरवी जिचा एक लेखिका म्हणून त्याला खूप अभिमान वाटायचा तिचं असं निरर्थक भावनाविवश होणं पाहिलं कि मात्र त्याची चिडचिड व्हायची. ‘मी लिहित वगैरे नाही हे बरंय बाई, नाहीतर आपल्या घरात सदैव पूरग्रस्त परिस्थितीच राहिली असती’ असं तो उद्वेगानं म्हणायचा.

    आज तर असे अगदी सार्वजनिक ठिकाणी नंदिनीचे डोळे वाहू लागले होते... सुट्टीचा दिवस आहे, मस्त बीचवर गार वारं खाऊ, मग बाहेरच जेवून परत येऊ असा अभयनंच सकाळी आनंदी प्लॅन करून नंदिनीला सांगितला होता... पण आपण कशाला इथं आलो असं आता त्यालाच वाटू लागलं होतं... येणारे-जाणारे, फेरीवाले, आजूबाजूचे पाण्यात खेळणारे लोकही त्यांची नजर तिच्याकडं जाईल तेव्हां त्याच्याकडं नजर वळवून साशंकपणे पाहात होते आणि अभयला आणखीआणखी कानकोंडलं वाटत होतं... कुणाला वाटावं, त्यानं काय केलं तिला कि तिला इतकं अनावर रडू येतंय अशी परिस्थिती होती... तो शक्य तितका मनावर संयम ठेवून तिला म्हणत होता, ‘नंदिनी, काय झालं? आठवण येतीये का कुणाची? आई-बाबांची येतीये का आठवण? तसं असेल तर फोन करून बोल. इथं टिपं गाळून काय होणार आहे?’ ह्यावर तिनं नकारार्थी मान डोलवल्यावर त्याचं आणखी बुचकळ्यात पडणं इतकंच घडलं... पुढं तो म्हणाला, ‘मग सोन्याची आठवण येतीये का? संडेच आहे आज, हॉस्टेलवरच असेल तो... क्लासेस वगैरे काही नसतील... लावू का फोन?’ त्यावरही तिनं मानगूट नकारार्थी हालवलं तसा तो फक्त चरफडून गप्प बसला.

    बरंच डोकं लावून जरा वेळानं अभयनं तिच्याकडं पाहात म्हटलं, ‘तुला कुणी काही बोललं का? फोनवरच्या संभाषणात किंवा व्हॉट्सऍपवर कुठल्या ग्रुपवर काही वादावादी झाली का? तिथं कुणी काही लागेलसं बोललं का?’ त्यावरही तिनं आणखी जोरजोरात नकारार्थी मान डोलावली पण डोळे वाहायचे मात्र काही कमी झाले नाहीत. अक्षरश: हताशपणे पण चिडक्या सुरात ‘मग माझा राग आलाय का? मी काही गाढवासारखा वागलोय का?’ असं त्यानं म्हटल्यावर तिला किंचित हसू आलं आणि पुढच्याच क्षणी रडतरडतच ‘तसं काही नाही रे, सांगता येत नाहीये मला!’ असं म्हणून तिनं परत ओढणी डोळ्याला लावली. आता त्यानं ‘काय वाटेल ते कर, बस रडत पाहिजे तेवढं’ असं मनातल्या मनात म्हणून खाली मान घालून बोटानं वाळूवर निरर्थक रेघोट्या मारायला सुरुवात केली होती. त्यामुळं किमान लोकांच्या विचित्र नजरा तरी झेलायला लागत नव्हत्या, एवढंच समाधानं त्याच्या पदरी आलं.

    कितीतरी वेळ स्टॅच्यू केल्यासारखी अशीच स्थिती होती. जरा अंधेरून आलं तसं अभयनं वर पाहात नंदिनीकडं नजर वळवली, तर आता तिचे डोळे वाहायचे थांबून तिनं समोरच्या समुद्राकडं कि बुडत्या सूर्याकडं टक लावली होती, नेमकी कुठं ते तिलाच माहीत!... निदान तिचं रडं थांबलंय ह्याचं त्याला बरं वाटलं. ते पुन्हा सुरू होऊ नये ह्याची काळजी घेत अगदी अलगद सुरात अभय म्हणाला, ‘नंदिनी, बरं वाटतंय का आता? काय झालं होतं तुला मगाशी? सांग बरं... बोललं की मन हलकं होतं गं!’ त्यावर काही क्षण त्याच्याकडं फक्त एकटक बघितल्यावर एका क्षणी उमाळा आल्यासारखी ती म्हणाली, ‘माझा सुजू गेला रे, अभय... कधीच परतून न येण्यासाठी!...मगाशी समुद्रात ते गलबत दूरदूर जाताना दिसलं बघ आपल्याला... ते बघून माझ्यापासून दूर निघून गेलेल्या सुजूची तीव्र आठवण झाली मला!’ लग्नाला वीस वर्षं झाली तरी अभयनं हे नाव तिच्या तोंडून कधीच ऐकलं नव्हतं... नात्यातही कुणाचं हे नाव नव्हतं... तिच्या इतक्या जवळचं कुणी म्हणजे तिचा लेक, भाऊ, मित्र ह्या यादीतही त्याला हे नाव दिसत नव्हतं. शेवटी त्यानं सरळच म्हटलं, ‘अगं कोण सुजू? कुठं भेटला तुला आणि कुठं निघून गेला?’

    ‘मंतरलेल्या वाटेतला सुजू रे... इतके दिवस जीव लावला मला आणि आज गेला सोडून...’ ह्या तिच्या वाक्याचा काहीही अर्थबोध न झालेला अभय जरा चाचरत म्हणाला, ‘कुठं आहे ही मंतरलेली वाट? इज इट अ प्लेस ऑर द नेम ऑफ द रोड ऑर हॉटेल?’ ह्यावर लटका राग डोळ्यांत घेऊन नंदिनी म्हणाली, ‘माझी दीर्घकथा रे... आज दुपारी नाही का लिहून पूर्ण केली मी... तिचं नाव मंतरलेली वाट... त्यातला माझा सुजू!’ ते ऐकून एकीकडं स्वत:चं हसू कसं आवरावं हे अभयला कळेना आणि दुसरीकडं मनात नंदिनीच्या ह्या त्याच्यादृष्टीनं अडग्या हळवेपणाची चीड, कीव, उद्वेग असंही कायकाय दाटून आलं. एका क्षणी संयम संपून अभय जोरात हसला आणि म्हणाला, ‘ओह ओके... नथिंग सीरियस देन... मला वाटलं कुणी खरंच हे जग सोडून गेलं कि काय?’ आता मात्र नंदिनी त्याच्यावर वसकलीच, ‘चेष्टा काय करतोहेस? गेला महिनाभर त्याच्यासोबतच जगत होते मी आणि आज होत्याचा नव्हता होऊन गेला!’ अभय परत हसत म्हणाला, ‘नंदिनी, ते फक्त तुझ्या कथेतलं एक पात्र होतं... जस्ट एक पात्र, यू नो!’

    ‘जगाच्या दृष्टीनं नुसतं कथेतलं एक पात्र असेल, अभय... पण माझ्या दृष्टीनं ते जणू माझं, माझ्या मनाचं आणि भावनांचंही अस्तित्व आहे’ नंदिनी फारच गंभीरपणे म्हणाली. तिचे डोळे परत भरून यायला लागलेले पाहाताच गंभीरपणाचा आव आणत अभय म्हणाला, ‘आय ऍम सॉरी, नंदिनी! मला असलं काही कळत नाही गं! तू शांत हो बघू... समजू शकतो मी तो गेल्यावर तुझं वाईट वाटणं!’ ह्यावर नंदिनीनं कृतज्ञपणे अभयकडं नजर वळवली पण त्याला गालातल्या गालात हसत असलेलं बघून तिचा परत भडका उडाला, ‘कायम टरच उडव नुसती माझी! पण तुला सांगते तंत्रज्ञान कितीही विससित झालं तरीही माणसाच्या जगण्याला अर्थ त्याच्या मनातले भावच आणतात!... यंत्रांचं तंत्र शिकून आणि सतत त्यातच काम करत राहून तुझंही मशीन झालंय, अभय!’ आता अगदीच दिलखुलास हसत अभय म्हणाला, ‘असेल बुवा! तुझ्या काय त्या मनोव्यापारातलं मला फारसं काही कळत नाही. ते ज्ञानग्रहण करायची मज पामराची कुवतही नाही आणि माझी इच्छाही नाही. पण एक वैश्विक सत्य मात्र मला माहीती आहे... जे तुझा हा कोण सुजू का काय, त्याच्या जाण्याची कारणमीमांसा करेल आणि तू सुखानं झोपू शकशील!... सांगू का ते वैश्विक सत्य?’

    नंदिनीनं फुरंगटूनच म्हटलं, ‘बोल, बोल, काय चेष्टा करायची ती करून घे! तुझ्या जिवाला ते करून समाधान मिळतंय ना...मग हरकत नाही!’ अभय तिच्या खांद्याभोवती हात टाकत म्हणाला, ‘चेष्टा नाही करत गं... सीरियसली सांगतोय... ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यूही अटळ आहे... माहितीये ना जीवनाचं हे सत्य तुला?... मग त्यानुसारच, तुझा सुजू जन्माला आला तेव्हांच त्याचा अंतही निश्चित झाला असणार... ते फक्त तुला माहीत नव्हतं इतकंच!’ आता मात्र मायाळू डोळ्यांनी त्याच्याकडं पाहात नंदिनी म्हणाली, ‘हो रे... हे का नाही आलं माझ्या मनात?... ह्या अशा जीवनातल्या सत्यांचा विचार करून आपण ती स्वीकारायचा प्रयत्न केला पाहिजे खरंतर!... पण मोहमायेतच किती गुंतत राहातो ना आपण!...’
    वैश्विक सत्यांवर चर्चा करण्याचा अभयचा उद्देश आणि इच्छाही अजिबातच नव्हती, त्यानं तिला मधेच ब्रेक लावत म्हटलं, ‘तर महत्वाचं काय... तुझ्या त्या सुजूच्या जाण्याचं अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, शोकही करायचा नाही...’ त्यावर ती समजदारपणे ‘हं’ म्हणाल्यावर आणखीनच चेव चढत तो पुढं म्हणाला, ‘तर आपण अगदी भावपूर्ण अंत:करणानं तुझ्या त्या सुजूला श्रद्धांजली, तिलांजली, भावांजली सगळं देऊया आणि त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थनाही करूया!’

    तिनं नुसतंच भावुक नजरेनंच त्याच्याकडं पाहिलं आणि स्वत:चं हसू महत्प्रयासानं दाबत मनातल्या मनात स्वत:ची पाठ थोपटून घेत तो म्हणाला, ‘वेल डन अभयराव... वैश्विक सत्यं तुमच्या पचनी किती पडताहेत हा भाग अलाहिदा... पण त्याच्या आधारानं वीस वर्षांत पहिल्यांदाच ह्या अडग्या हळवेपणावर मात करणं जमलंय तुम्हाला... कीप इट अप, अभयराव, कीप इट अप!’

    © आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई



    आसावरी वाईकर


Your Rating
blank-star-rating
स्नेहमंजरी भागवत - (14 July 2021) 5
वेगळी गोष्ट पण मजेदार

1 0

Dr. Vidya Velhankar - (08 July 2021) 5

1 0

M Veena Harne - (07 July 2021) 5

1 0

Seema Puranik - (06 July 2021) 5
👌मस्त

1 0

Neha Khedkar - (06 July 2021) 5
तुमच्या कथांमध्ये जादू असते👌👌खुप आवडली कथा

1 1

Veena Kantute - (05 July 2021) 5
फारच सुंदर! लेखिकेचे लेखिकेला समजून घेणे भावले.

1 1