सांप्रतकाळी व्हाट्स अप फेस बुक आदी सोशल मीडियाला आभासी जग म्हणून हेटाळणी केली जाते आणि यातून आपण बाहेर कधी येणार हा खुप वैध आणि गंभीर प्रश्न उपस्थित केला जातो आहे. गंमत म्हणजे हा प्रश्न या सोशल मीडियामधूनच प्रचलित केला जातोय.
परंतू जरा वेगळा विचार केला तर !
“ हे आभासी जग नाही ”
अतिप्राचीन-प्राचीन काळात दळणवळणाची, संदेशवहनाची, विद्यादानाची, युद्धशास्त्राची वेगळी परिमाण असत. भय-भुक-मैथुन या सजीवाच्या मुलभुत गरजानंतर जसजशी मानवी बुद्धी विकसित होत गेली तसतसं प्रत्यक्ष संपर्कान्वये या मानवी या षङ्रिपुनुसार मनुष्यस्वभावाची प्रतीक कार्यरत होत गेली.
वाऱ्याच्या वेगामुळे मनुष्य वेगाकडे आकृष्ट झाला असेल. चित्याची चपळाईची तर मोठमोठ्या वृक्षराईची, उत्तुंग पर्वतराजींची आणि सागराच्या अदृश्य खोलीची आसुया मानवी मनात घर करून असणार. ज्वालामुखीच्या संहारक दर्शनाने त्याने अदभुतता शिकली असणार तर प्रलय भूकंपादी आपदेमुळे निसर्गाच्या गूढगर्भतेने मानव स्तिमित झाला असणार.
त्याकाळी मनुष्य निसर्गाकङुन काही गोष्टी शिकत गेला असणार.
*दळणवळण* -चालत जाण हे प्रवासाचं एकमेव साधन, पुढे घोङस्वारी, रथामधे संक्रमित झालं असाव.
*संदेशवहन*- मौखिक संभाषणाचा पुढे दुताकरवी मौखिक संदेशाचे वहन होत असावे.
*विद्यादान*- वेदप्रचुर प्रखर बुद्धीयोगी ऋषीमुनिंच्या काळी केवळ पाठांतर हाच विद्यासंक्रमणाचा मार्ग असे.
*युद्धशास्र*- दोन योद्ध्यांच्या भौतिक स्पर्शाशिवाय एकमेकांना इजा करु शकत नव्हते.
*या काळी कागद बोरु या लेखण प्रक्रियेचा शोध लागला नव्हता अशी माहिती आहे*
*महाभारत महर्षी व्यासांनी सांगितले आणि श्रीगणेशाने लिहिले अशी आपली माहिती-चित्रे आहेत. बहूदा ती अलिकङली असावीत.*असो*
कागद-बोरु या लेखण साधनाच्या शोधानंतर वर उल्लेखित मानवाच्या मुल्यवर्धित गरजा पुर्ण करण्याची व्याप्ती आणि क्षमता शेकङोपटींनी वाढली असावी.
समर्थांच्या एका ओवीत त्याचा उल्लेख आहे.
पीतापासून कृष्ण जालें |भूमंडळीं विस्तारलें |तेणेंविण उमजलें | हें तों घडेना ||१५.६.१||
महीसुत सरसाविला | सरसाऊन द्विधा केला |
उभयेता मिळोन चालिला |
कार्येभाग ||१५.६.३||
स्वेतास्वेतास गांठीं पडतां | मधें कृष्ण मिश्रित
होतां |इहलोकसार्थकता| होत आहे ||१५.६.४||
लेखणाच्या शोधानंतर संदेशवहन, विद्यादान, युद्धकौशल्य यांच्या संधी आणि व्याप्तीमधे अमुलाग्र बदल झाले असावेत. लखोटा घेऊन दुताकरवी प्रेमाचे, विद्येचे, युद्धनीतीचे, सामान्यप्रशासनाचे संदेश वहन सुरु झाले असावे. कवी कालीदासाची आषाढातील मेघांना प्रियेतमेसाठी प्रेमसंदेश घेऊन जाण्याचे कल्पो-कल्पित निवेदन असो किंवा प्रत्यक्षात कबुतरांकरवी अथवा घोड्स्वाराद्वारे गुप्त खलिते रवाना होऊ लागले.
आपण कालीदासाच मेघदुत या खंङकाव्याची अत्यंत रसिकतेने प्रशंसा करतो आणि त्याद्वारे बरेचसे भौतिक कार्यक्रम आयोजित करतो. या काव्यामधे मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. हलगर्जीपणामुळे त्यास शिक्षा झाली हद्दपारीची आणि वर्षाऋतूत पत्नीवियोगाने व्याकुळ झालेला हा नायकाची मनोवृत्ती एकदम उचंबळून आली. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून आपल्या पत्नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले. प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची रवानगी केली. करुणरसपरिप्लुत कमीजनांना पीडा देणाऱ्या भावनांच्या संदेश वाहनाच्या वर्णनाचे हे काव्य अतिशय रमणीय आणि मानवाच्या मुल्लवर्धित साहित्तिक गरजा पुर्ण करणारे आहे. या कल्पनाधिष्ठित काव्याची आपण आभासी म्हणून संभावना केल्याचे ऐकिवात नाही.
जसेजसे धर्माचरणातील संकल्पना आणि विज्ञानाचा समागम आणि प्रसंगी संघर्ष होऊ लागला तसे आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने मानवाच्या याच मुल्यवर्धित गरजांचे परिप्रेक्ष्य विस्तारत गेले. धर्मपंङीत आणि विज्ञान संशोधक यांचे फार मोठे द्वंद्व त्याकाळी अनुभवास आले. या समुद्रमंथनातुन जे ही अमृत आणि विष निर्माण झाले त्याचाच परिपाक म्हणुन टेलिग्राम-टेलिफोन ही तंत्रज्ञानाची संदेशवहनाची पहिली मुहुर्तमेढ रोवली गेली आणि बरोबरीनेच आपण जपानवरील अणुबाँबची भीषण विघातक दाहकता अनुभवली. या शोधांमुळे वर उल्लेखित मुल्यवर्धित मानवी गरजा पुर्ण करण्याची व्याप्ती आणि क्षमता हजारोपटींनी वाढली असावी.
अतिप्राचीन मानवी प्रवृत्तीने दगङी हत्यारे बनवुन शिकार करणे हा तंत्रज्ञानाचा पहिला अविष्कार आहे अस सांगतात तसेच काही मिलीएन वर्षापुर्वी दगङांच्या घर्षणाने आगीच्या ठिणग्यांचा शोध लागला अस मानतात. पुढील टप्पे आपणा सर्वांना ज्ञात आहेतच परंतू सर्वसामान्यपणे अस्पर्शित असा महत्वाचा टप्पा आहे तो जणुकीय अभियांत्रिकी वा अनुवांशिक अभियांत्रिकी म्हणजेच जेनेटीक इंजिनियरिंग. हे तंत्रज्ञान अगदी अलीकडील म्हणजे १९७२ साली विकसित झाले. मानव प्राचीन काळापासून झाङे झुङपे पीके व जीवजंतुंच्या प्रजनन क्रियांमधे हस्तक्षेप करुन नव-नवीन वानांची निर्मिती करीत आला आहे. या तंत्राच्या वापराने वैद्यकीय आणि अन्न-पीके वृध्दीतंत्रामधे झालेल्या अविश्वसनीय विक्रमी उत्पादन क्षमतेने आणि गुणवत्ता नियंत्रणामुळे आज जगाच्या ७.७ अब्ज एव्हङ्या अजस्र लोकसंख्येला फायदाच झाला.
कल्पनाशक्ती ही सर्व शोधाची जननी आहे असं अल्बर्ट आईनस्टाईनच वाक्य होत. कल्पनाधिष्ठित विश्वातूनच विज्ञान, शास्त्र आणि पुढे तंत्र विकसित होत.
इथपर्यत ठीक होतं, तंत्रज्ञानाला नावे ठेवली जात होती परंतू *आभासी जग* असं त्याच नामकरण झालं नाही. तसं पाहिल तर वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणुन अमर्याद मानवी मुल्यवर्धित गरजा पुर्ण करण्याची व्याप्ती आणि क्षमता वाढविण्याचे श्रेय आणि दुष्कर्म याच जेनेटीक इंजिनियरिंगच. दुष्कर्म अशासाठी की वाढवा लोकसंख्या कितीही आपण परिपुर्ती करु शकतो तर श्रेय अशासाठी की वैद्यकीय क्षेत्रातील उपयोगीतेने अवाढव्य लोकसंख्येच आरोग्य सांभाळल जातय. अर्थातच लोकसंख्या वाढीच्या इतर ज्ञात कारणांबरोबरच जेनेटीक इंजिनियरिंगचही अप्रत्यक्ष योगदान आहे.
आता या साखळीमधे तिसरा आणि अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे माहिती-तंत्रज्ञान इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी. सुमेरीयन ही प्राचीन नागरीकरणाची पहिली वसाहत तेव्हाच्या मेसोपॉटामिया या विभागात वसली होती. सुमेरीयन राज्यकर्त्यांच्या मान्यतेनुसार ईश्वरी ईच्छेनुसार वसाहतीकरणाची मुहुर्तमेढ रोवली गेली आणि शिकारी टोळ्यांमधुन वास्तव्य करणारा मानव स्थिरस्थावर झाला. पर्शियन आखातातील टिग्रिस आणि युफ्रेट्स या दोन नद्यांच्या खोऱ्यामधे ही पहिली वसाहत वसली होती अस मानन्यात येत. सुमेरीयन संस्कृतीमधे प्राचीन लिखाणाचे पुरावे आढळलेत. मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या तुकङ्यांच्या चिन्हांचा उपयोग वस्तु-माल यांचे मोजमाप करीत असत. इथुनच मोजमाप - गणणेची म्हणजे कंम्प्युटेशनची सुरवात झाली असं मानल जात.
माहिती - तंत्रज्ञान चार मुख्य स्तरावर विकसित होत गेल. परंतु सध्याच इलेक्ट्रॉनिक आणि काही प्रमाणात इलेक्टॉमेकेनिकल तंत्र मानवी जीवनावर प्रभाव ठेवतय.
क्रमशः
घनश्याम परकाळे