काही बोलायाचे आहे
परवाच वाचलेली बातमी ,','क्लोनिंग द्वारे जन्माला येऊ घातलेलं खरंतर तयार होणार बालक लवकरच जन्माला येणार आहे जगभरातील कितीतरी संशोधक या कार्यात मग्न आहेत.
वाचून मला कुठेतरी हादरल्या सारखं वाटलं
.खरंतर मातृत्व आणि वात्सल्य या गोष्टी देवाघरचे लेणे ,मिळालेले मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना .ती स्त्रीची प्रबळ नैसर्गिक भावना. मातृत्वाचे किती गोडवे कवी लेखकांनी गायले आहेत .मर्ढेकरांची सारखा कवी गर्भवती स्त्रीला पाहून ,"थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेतो "असे भावविभोर होऊन गाऊन जातो.
आता काळ बदलला असला तरी त्या बदलत्या काळाबरोबर मातृत्वाचे संकल्पना बदलत गेली. पण तिचे पावित्र्य अजूनही सर्व देशात सर्व धर्मात कायमच आहे .फक्त बदलत्या काळाच्या ओघात या मातृत्वाच्या ला व्यावहारिक तपशील मिळाले इतकेच काय ते!
माझी दूरची आजी सांगायची तिच्या आजीला बावीस मुले .मुले देवा घरची फुले या भावनेने जन्माला आलेलीआणि एकत्र कुटुंब पद्धतीत चारचौघांसारखे बिन तक्रार वाढणारी .चुकून एक रात्री एक पोर अंगणात झोपलं तर आईला कळलच नाही. रडण्याचा आवाज आल्यावर गस्त घालणाऱ्या शिपायाला आवाज आल्यावर त्यानं आईला आवाज देऊन उठवलं ,तेव्हा ती जागी झाली आणि पोराला घरात घेतलं. दरम्यान काही मुलं प्लेगच्या साथीत गेली आणी उरली फक्त बारा.
दिवस बदलले ,तसे नांदते गोकुळ संकल्पना मागे पडली. बाईच्या हातात फक्त पाळण्याची दोरी देऊन ती त्यातून जगाचा उद्धार करेल, असे समजून मुलांना जन्म दिला की त्याचबरोबर स्वतःचाही उद्धार झाला या समाधानात बसायची कल्पना आता संपली. "हम दो हमारे दो" असं घोषवाक्य असलेलं चौकोनी कुटुंब ही काळाची गरज झाले. नवविचारांची वारे आले .स्त्रीही अर्थार्जनासाठी बाहेर पडली आणि तिने घराबाहेर टाकलेले पाऊल ही तिच्या आयुष्यातील स्वातंत्र्याची खरी पहाट ठरली. आपल्याला पाहिजे तेवढीच व पाहिजे तेव्हाच मुले झाली पाहिजेत आणि आपल्याला नको ती तेव्हा आपण नाकारू शकतो, ही जाणीव तिला नव्याने झाली, तेंव्हा तिच्या नेहमीच्या मळलेल्या पायवाटेने अडखळत चालणे थांबले आणि जीवन राजरस्त्याने धावू लागले. कर्तुत्वाची नवी क्षितिजे तिला खुणावू लागली, हे सर्व शिक्षणाने साध्य झाले.
आईचे अनुभवाचे क्षितिज विस्तारले, तसा तिचा बाळबोधपणा जाऊन तिला आणखी नव्या कर्तुत्वाची जाणीवही झाली. त्यादिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीला आईला सुनावताना ऐकलं," अगं मे किंवा जून महिन्यात मूल जन्माला आलं की शाळेच्या नववर्षाचे मुलाच्या वर्षाचं गणित अचूक जमतं ,नाहीतर वर्ष वाया जातात ,यादृष्टीने प्लॅनिंग केलं आणि ते बरोबर जमलं .
माझ्या मांडीवर तिने दिलेल्या बाळाचा कौतुकानं पहाणाऱ्या माझ्या तोंडाचा आ वासला होता .तिन पुढे केलेल्या पेढा मी हातात घोळवत राहिले कितीतरी वेळ! पुन्हा पेनलेस डिलिव्हरी व्हावी म्हणून इंजेक्शन घेतलं ,सिझेरियन करून घेतलं हे ऐकून मी तर उडालेच.
आता काजळ माखलेल्या बाळाचं आणि न्हाऊ माखू घालून डिंक हळीव खाऊन गरगरीत झालेली त्याची आई ते चित्र दुर्मिळ झालंय .मुलाला जन्म देऊन एक-दोन महिन्यातच नोकरीच्या मागे धावणारी त्याची आई! कदाचित संध्याकाळी घरी परत यायला उशीर झाल्यावर बाळाच्या ओढीने कासावीस होणारी हिरकणी तिच्यात असेलही पण नव्या जबाबदारीने हळवेपणावर मात केली .यावेळी बाळाला घरट्यात सोडून चा-यासाठी उंच भरारी मारणारी पक्षीण तिच्यात वसत असते.
पुरुष मात्र या सर्वात थोडासा अलिप्त असतो .त्याला आपल्या अपत्याचं कौतुक असतं ,पण मातृत्वा मागचा मानसिक बदलांचा अनुभव त्याला नसतो. त्याच्या दृष्टीने बाप होण हे सहज असतं.
त्याचा त्याच्या करिअरवर काही परिणाम होत नसतो पण बाईला मात्र घराबाहेरचे काम आणि मातृत्वाची जबाबदारी सांभाळताना तिची तारेवरची कसरत सुरू असते. बाळाच्या सर्वांगीण विकासात आई तन-मन-धन देते .त्याच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाशी ती जोडली जाते पण मुलाला जन्म देऊनही तिची कहाणी सफल संपूर्ण होत नाही तर मुलाला जन्म देऊन असंख्य कर्तव्ये पार पाडता पाडता ही कहानी होते नव्या प्रश्नांची .म्हणून आई होण्यापूर्वी बाईचं सुशिक्षित होणे आवश्यकच असतं.
आज-काल मात्र तिच्या आईपणाचं मार्केटिंग होत असल्याचे दिसते आईसाठी गरोदरपणी करावयाच्या व्यायामाचे क्लास, पोटावर आईपणाच्या मागे राहणाऱ्या खुणा पुसून टाकण्याची क्रीम. यशस्वी आई होण्यासाठी काय कराल ही पुस्तके सगळं बाजारात मिळतात. त्यामुळे आयुष्याची नाजूक भावना कुठेतरी लुप्त होत आहे असं वाटतं.
टेस्ट ट्यूब बेबी चा शोध लागला आणि बाईच्या वांझ म्हणून निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा निघाला ,कुठेतरी एखादी मुलगी समाजात लग्न न करता आपल्या अपत्याला स्वतंत्रपणे वाढवताना दिसू लागली. हेहीआपण स्वीकारलं पण आता क्लोनिंग !एका स्त्रीच्या चेहऱ्याची प्रतिकृती असणार बाळ निर्माण करायचं, याच्यात आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीचे गुणदोष संगणकाच्या मदतीने घालायचे ,मग त्यात संस्कारक्षम मन असेल की नाही, ते विकृत निर्माण झालं तर हा विचारच त्यात नसतो .खरंतर स्त्री-पुरुष मिलनातून निर्माण होणारे बाळ आईच्या उबदार मायेन पोटात वाढणारं, दोघांना मायाच्या धाग्याने बांधणार ,दोघांचं गुणदोष घेऊन जन्माला येणारे बाळ हे परिपूर्ण नसले तरी अदृश्य धाग्याने आईवडिलांना बांधून टाकतंपण क्लोनिंग समाजात रुळलं तर हे एक निर्मितीचं सुंदर स्वप्न पृथ्वीतलावरून नष्ट पावेल .स्त्री आणि पुरुष दोघांनाही ,,'वो सपना तेरा होगा वो सपना मेरा होगा ,"असं म्हणता येणार नाही .आईपणाचं सार्थक बाई जातीला हवं असतं. ते शाश्वत सत्य आहे.
आई ही चिमुकल्या ओठातून आलेली हाक
ऐकताच तिला गंगेत न्हाल्यासारखे वाटते.
हे क्लोनिंग असे मांगल्य जपू शकेल?
रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई
. रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई