पिंगा ग पोरी पिंगा
" अनु , ए अनु....हाकांचा जोर वाढत गेला,
तशी नेसायला घेतलेली साडी तिन काॅटवर ठेवली. आणि बाहेर धावत जाऊन विचारलं ,"काय झालं काय हवय तुला अवि?"
तिच्या प्रश्नावर वैतागत तोम्हणाला ,'अगं काय हवाय म्हणून वर तोंड काढून काय विचारते आहेस ?आणि तिच्यासमोर शर्ट नाचवत त्यांन म्हटलं,
" चार दिवस झाले तुला सांगितलं होतं ना या शर्ट ला बटण लाव म्हणून !एक काम धड होत नाही तुझ्याकडून!"
तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं ,पण त्याच्या चेहऱ्यावरची मग्रुरी ,त्याचं ते ओठाला मुरड घालून तुच्छतेने बोलणं पाहताच तिला जे सांगायचं होतं ते ओठावर न येताच विरून गेलं .माहीत होतं तिला ,बोलून काही उपयोग नाही. तीच वादावादी .शेवटी त्याचं धुमसण आणि घरातलं वातावरण बिघडायला नको म्हणून नेहमीसारखं तिचं माघार घेणं. खिन्नपणे हसत समजावणीच्या स्वरात तिने म्हटलं ,"वेळच मिळाला नाही रे आणि पटकन दुसरा शर्ट काढून त्याच्या समोर धरत ती मला म्हणाली," हा घालना प्लीज"
त्यावर दिलेला शर्ट बाजूला सारत त्यानं म्हटलं," अगं सेमिनारला जातोय मी !पेपर वाचायचा आहे मला! प्रेझेंटेशनमध्ये लोक मलाही पहाणार. तुझ्यासारखी आकडेमोड थोडीच करायची आहे खुर्चीवर खाली मान घालून बसून . लोक येणार ,त्यांच्यात कसे व्यवस्थित दिसायला हवे पण तुला काय त्याचं,तू आपली स्वतःतच गुंग!"
तिन त्याच बोलण ऐकलं नऐकलंस करून घड्याळाकडे पाहिलं .तिला बाहेर पडायला अर्धा तास राहिला होता. आणि डायनिंग टेबलवर तिची लेक पल्लवी बसली होती. तिच्यासमोर दुधाचा भरलेला ग्लास तसाच होता. तिच्याशी बोलत तिने तिच्या ग्लासमध्ये आणखीन बोर्नव्हिटा घालून पल्लू च्या तोंडाला दुधाचा ग्लास लावला. 'चल मी गेलो 'असं बाहेरूनच त्यांना म्हटलं तसा तिने समाधानाचा सुस्कारा सोडला
सकाळ तशी घाईत गेली होती .तिनं कणीक भिजवून ठेवली कुकरची तयारी केली .भाजी चटणी सगळं झालं होतं पण पोळ्या करायला अनुच्या सासूबाईंना जड जायचं .तिचं नोकरी करणं त्याना नको होतं .उतारवयात नवसाने झालेला त्यांचा मुलगा अविनाश ,अतिशय लाडात वाढलेला .अकाली आलेलं वैधव्य आणि जबाबदारी, त्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा झाला होता की पूर्वीपासून तो तसाच होता हे अनुला कळत नव्हतं. येणारा जाणा-याला त्या सूनावत राहायच्या
" माझ्या मेलीचं नशीबच खोटं ! म्हटलं आलीये एकुलती एक सून तर जरा विश्रांती मिळेल .पण कुठलं काय! राजाराणी बाहेर नोकरीला आणि मी आपली राहते कामवाली, हक्काची घरात!
जणूकाही अनु नोकरी करते म्हणून गाड्या गिरद्यात आरामात लोळत होती. पण त्यांच्या तोंडाला तोंड देण्यापेक्षा मूग गिळून गप्प बसणे तिला सोयीचे वाटत असे.पल्लवीच्या जन्मानंतर तिला सांभाळायला जमणार नाही म्हणून सांगत त्यांनी ठाम नकार दिला होता तशी अनुनं तिची पाळणाघरात सोय केली .तिने ठरवलं होतं ,काही झालं तरी नोकरी सोडायची नाही
किती कष्टाने एम्. बी .ए .केले होते तिने तेही फायनान्स विषयात.अनु बीकॉम फर्स्ट क्लास पास झाली होती .एका खाजगी कंपनीने तिला चांगली पोस्ट देऊ केली, तिने ती नोकरी स्वीकारली पण तिथे वेळेच बंधन नव्हतं, रात्री कधी कधी उशिरा थांबावे लागे. अभ्यासात हुशार असलेल्या अनुचं घर जुन्या संस्काराचं होतं .मुलींना वेळेवर घरी यायला हवं या विचाराचे आई-वडील .आता तिचे आई वडील जोमाने तिच्यासाठी स्थळं पहायला लागले होते. तेव्हा तेव्हा अशा खाजगी कंपनी मध्ये नोकरी, वेळीअवेळी तिचं घरी येणं ,वर पक्षाच्या डोळ्यावर येईल या विचाराने आई-वडिलांनी तिला नोकरी सोडायला लावली .बँकेच्या परीक्षा तिने दिल्या आणि क्लर्कच्या पोस्टवर तिला बँकेत पटकन नोकरी मिळाली .अविनाशकडून होकार आला, तेव्हा तिला खूप आनंद झाला .अविनाश स्वतः सी. ए. होता .त्याला नामांकित कंपनीत मोठी नोकरी होती.घरी फक्त वृध्द आई आई .शिवाय ती नोकरी केलेलं त्याला चालणार होतं ,म्हणून ती खूप आनंदात होते पण त्यांन तिला सांगून ठेवलं होतं आईला दुखवणे मला जमणार नाही ,तिनं खूप कष्ट केलेत माझ्यासाठी. तुम्ही दुखवू नकोस. तिने निमूटपणे ती अट मान्य केली होती. आईनही सासरी जाताना सांगितलं होतं ,सासूबाईला मान दे. बघ त्यांचा शब्द मोडू नको.
आईला तिने तसा शब्द दिला होता पण सासूबाईंच्या स्वभाव पाहता आईला दिलेला शब्द निभावणे तिला खूप त्रासाचे मनस्तापाचे झाले होते.तिला वाटलं होतं निदान नवरा तरी समजुन घेईल पण त्याच्या सहवासात राहून तिला कळत गेलं, तो हट्टी आहे ,आपलं तेच खरं खरं करायची त्याची वृत्ती आहे .मग अनुने आपले ओठ मिटून घेतले.. सुरुवातीला कधी ती तक्रार करायची पण त्यांन एकदा तिला निक्षून सांगितलं होतं ,"हे बघ मी आहे असा आहे .मी बदलणे शक्य नाही. तो माझा पिंड नाही तुला जुळवून घ्यावं लागेल. जमलं तर ठीक नाहीतर तुला तुझा मार्ग मोकळा आहे.
पल्लवी च्या वेळी दिवस राहिले ,तेंव्हा कडक असे डोहाळे लागले होते पण अनुने त निभावून नेलं .पल्लवी जरा मोठी झाल्यावर बँकेत मॅनेजरची पोस्ट मिळणार होती पण बदलीही अपरिहार्य होती. त्यामुळे तिनं प्रमोशनला नकार दिला. करिअर च्या गोष्टी आपल्यासाठी नाहीत याची पक्की खूणगाठ बांधली .बँकेच्या वेळेपर्यंत जमेल तितका स्वयंपाक घरकाम सगळं तिच्या अंगवळणी पडलं आणि संसाराचा पाया भक्कम राहिला .वरवर सगळं चालू होतं.अलबेल होतं.
अविनाश मात्र आपल्या हुशारीच्या जोरावर नोकरीत वरवर चढत गेला. घरी सगळं व्यवस्थित असल्यामुळे त्याचा नोकरीतला प्रवास तसा सुखमय झाला
अनू मात्र ठराविक वर्तुळात फिरत राहिली.
बेल वाजली तशी अनु विचारातून भानावर आली.लगबगीने दार उघडले .दारात अविनाश उभा होता. आपला पेपर तिच्यासमोर नाचवत त्यांन म्हटलं ,"अनु आय गॉट इट .सेमिनार मध्ये मी पेपर वाचला तेव्हा सर्वांनीच कौतुक केलं माझं आज सगळ्यांच्या तोंडी माझ्या पेपरची चर्चा होती.
इतका वेळ तिच्या मागे उभ्या असलेल्या सासुबाई पुढे येत म्हणाल्या,
"केले असेल रे बाबा कौतुक !तुझी खरंच दृष्ट काढायला हवी तुझी .आणि तिच्याकडे वळून त्या म्हणाल्या,,"लहानपणापासून असा हुषार आणि जिद्दी .जे वाटेल ते करून दाखवायचं .अग पाहतेस काय अशी? कसलं कौतुक नाही नवऱ्याचं तुला. गरम-गरम शिरा कर. तोंड गोड कर त्याचं. दमला असशील नारे दिवसभर .गरम शिरा खा आणि विश्रांती घे.
अनुनं अगदी मनापासून त्याचं अभिनंदन केलं .खरंतर आज दिवसभर आकडेमोडी ने तिचं डोकं भणभणत होतं. पाय वळून येत होते अलीकडे पण स्वतःकडे बघायला सवडच नव्हती तिला .तिला माहित होतं हे असच चालणार .तिला उगाच आठवलं एम.बी. ए.च्या प्रोजेक्टच्या वेळी केलेली धडपड आणि त्याचं झालेलं कौतुक मिळालेली ए प्लस ग्रेट पण आता त्याचं काय?
एक सुस्कारा टाकत ओट्या कडे वळली रवा भाजायला घेतला .तिला तो लहानपणी आपण खेळत असलेला एक खेळ आठवला, पिंगा ग पोरी पिंगा ,खेळात शरीर वर्तुळाकार फिरवायचं पण पाय हलवायचे नाहीत .पाय जागेवर आणि फिरणं ठराविक वर्तुळात फिरायचं. इतके मोठे झालो आपण तरी तोच खेळ अजुनी खेळतो आहोत .पिंगा तिनच घालायचा ,चालायचं काढलेल्या ठराविक वर्तुळात. पाय मात्र जमिनीला रुतून. इतकी शिकली सवरलेली अनूपण या पिंग्यातून सुटका नव्हती तिची .
रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई