• 03 December 2020

    गोधडी

    चैती

    5 289

    चैती

    वा-याची कळी मिटलेली ,सपाट रस्त्यावर उन्हाने रांगोळी घातलेली ,रस्त्याच्या दोन्ही बाजूला क्वचितच दिसणारी गुलमोहराची झाडं ,लांबलचक डांबरी रस्ता आणि त्या रस्त्यावर चैती चटचट जोडव्याचा आवाज करत चालली होती.

    अंगावर ठिगळ लावलेलं लुगडं ,मोठ्या खणाची दंडात रुतणारी चोळी ,कपाळावर हे एवढं रुपया एवढं लालभडक कुंकू गळ्यात काळ्या मण्यांची पोत ,कपाळावर केसांच्या बटा पुन्हा पुन्हा येत होत्या. पुढे तिचा नवरा आणि मागून मुलगा चालला होता .मुलगा आये,आये म्हणत तिला काही सांगू पाहत होता .पण तिला त्याचं काहीही सोयरसुतक नसल्यासारखं ती तरातरा चालत होती.तिनं काखेला मारलेल्या झोळीत तिचे लहान लेकरू झोपलं होतं. आणि त्या झोळीतून जाणवणारा त्या पोराचा उनऊनीत स्पर्श तिला अस्वस्थ करून राहिला होता .तिच्या नजरेसमोर राहून राहून दिसत होतं ते ग्राउंड ,सभोवती खूप दाटीवाटीनी उभी असलेली घरे ,तिथे पोचण्यासाठी ती झपाझप पावलं उचलत होती, आपल्याच नादात.

    सकाळी तिला पाला जवळ शिवा भेटला होता तेव्हा ती आपल्या लेकराला डॉक्टर कडून घेऊन आली होती .लेकरू तापानं फणफणत होतं .अवघं दहा महिन्यांच पोरगं असं तापानं फणफणताना बघून तिचा जीव नुसता कासावीस होत होता. राहून राहून तापान लाल झालेल्या पोराच्या तोंडावरून हात फिरवत होती. वैदू,झाडपाल्याचे औषध तिला माहीत असलेलं सगळं केलं तिनं,पण काही उपयोग झाला नव्हता. चार दिवस झाले तरी तापाला उतार पडला नव्हता .पाला पलीकडं एक डॉक्टर होता. कुणी सांगितलं तो ताप आला की सुई टोचतो. लगेच ताप जातो पण त्याची फी दहा रुपये.

    ती त्याच्याकडे गेली, त्याच्या हातापाया पडली,पण त्यानं दहा रुपये दिल्याशिवाय सुई टोचायला नकार दिला .परत येताना पालाजवळच तिला शिवा भेटला. त्याला तिनं सर्व काही सांगितलं,तसा तो म्हणाला,

    "अगं डोंबा-याची जात आपली. हातातोंडाशी गाठ पडायची पंचायत !असं बसून भागत व्हयं माझे बाय .?रेल्वे गेट जवळ मैदानात खेळ कर.शाळा बंद आहे घरही हाईत आसपास. तिथे खेळ बघायला लोकंबी येत्याल.पैकबी बरं गावतील. त्यातून लेकराला दवादारू कर."

    पैकं बरं गावतील म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर सूक्ष्म आनंदाची रेषा उमटली. तिच्या आशा पालवली .आता पोराला बरं नाही म्हणून खेळही बंद होता .गाठीचे पैसे किती असणार ,चार दिवसात ते संपले. आज पदराच्या गाठीत बांधलेल्या पुरचुंडीतून पैसे काढले तेव्हा कुठे चहा आणि एक पाव खाऊन झाला. तिला वाटलं ,बरं झालं ,शिवा भेटला , त्याच्या रूपानं देवच बोलला .

    कसल्याशा निश्चयाने ती खोपटात शिरलीआणि गुडघ्यात मान घालून बसलेल्या नवऱ्या पुढे जाऊन त्याला हलवत म्हणाली ,"बसून का राहिलास?उठ आपणास खेळ करायला जायचं हाय.

    तिच्या बोलण्याने नवरा दचकला. चमकून म्हणाला," अगं आई आहेस की कोण हैवान हाइस? अग आपलं लेकरू तापलय.. नव्ह ?त्याला घेऊन खेळ कसा दावायचा ?आई हाईस का वैरी?" त्याचा संताप उफाळून बाहेर येत होता.

    समजुतीच्या स्वरात त्याची नजर चुकवत ती म्हणाली,

    ",आव ,त्यापाईच म्हणतीया न्हवं?आज खेळ केला तर चार पैकं घावतील.आम्ही उपाशी राहू पण पोराला डॉक्टर कडून सुई ठोपून आणू. काय व्हायचं नाही त्याला. पोरगा एकदम बरं होईल .आनी जर व्हायचं असेल तर असं बसल्यावर काय चुकणार होय?

    चैतीच्या आवाजातली निकड तिच्या नवऱ्याच्या काळजाला स्पर्शून गेली.त्याला बळ आलं ,तो उठला आणि कोपऱ्यात ठेवलेले काठ्या दोर तर हातात घेतले.खुंटीवरच ढोलक काढलं आणि मघापासून दोघांकडे आळीपाळीने बघणाऱ्या मोठ्या लेकाच्या गळ्यात अडकवल," चल बाबा जाऊया खेळ दावाया." असं म्हटल्यावर पोरगं खूष झालं.तिथे मिळणाऱ्या भाकरतुकड्याच्या च्या आशेन त्याच्या पोटातली भूक आणखीनच चाळवली.

    विचारांच्या नादात मैदान कधी आलं हे तिला कळलंच नाही .मैदानाच्या कडेला एक आंब्याचे झाड होत.झाडाच्या सावलीत तिनं पटकुर पसरलं आणि त्यावर आपलं लेकरू ्व्यवस्थित निजवलं. मैदानावर तिच्या नवऱ्याने दोन-दोन काट्या तिरप्या लावून एकमेकांच्या सहाय्याने उभ्या केल्या .दोन्हीमध्ये दोर बांधला, तोपर्यंत पोरांन गळ्यातली ढोलकी बडवायला सुरुवात केली होती. ढोलकीचा आवाज तिच्या अंगभर भिनला,

    तशी चैती आपलं आजारी लेकरू, आपली व्यथा सगळच विसरली.तिन आपल्या सामानातील थाळी हातात घेतली आणि एका हातात ती धरून दुसऱ्या हातानं तिच्यावर थाप मारीत खड्याआवाजात म्हणू लागली,

    " ओ माडीवाल्या बाये,पोराबाळानु सगळी या .आमची करामत ,गरीबाचा खेळ बगा. आवडल तर पैका द्या."

    शाळेला सुट्टी, दोन अडीचची वेळ जेवण वगैरे आवरलेले .पोरं गम्मत बघायला मिळणार म्हणून त्या छोट्याशा मैदानावर येऊ लागले .सुस्तावलेली घरं जागी होऊ लागली.माडीवरल्या खिडक्या उघड्या केल्या गेल्या .खिडक्यातून आयाबाया डोकावू लागल्या.ढोलकीचा आवाज टीपेला पोचला . मैदानावर खूपसे बघे जमले,तसे चैतीच्या नवऱ्याने पोराच्या हातातली ढोलकी आपल्या गळ्यात घातली. त्यानं ढोलकी वाजवायला सुरुवात करताच तिच्या मोठ्या पोरांनं त्या मैदानावर कोलांट्या मारल्या दोन बाटल्यावर उभे रहात कसरतीचे खेळ केले. जाळ लावलेल्या रिंगणातून उड्या मारल्या .लोकांनी मुलांनी खूप टाळ्या वाजवल्या.

    मग तिच्या नवऱ्याने चैतीला इशारा केला, तशी तिनं मग हातात लांब लांब लांब बांबू तोलून ढोलकीच्या तालावर दोरीवरून चालून दाखवले .आता नवऱ्यानेआपलं ढोलकं तिच्या गळ्यात अडकवलं. लांब काठीला आपले इवलसं लेकरूं बांधताना पाहून तिचं काळीज लकाकलं पण तिनं निमुटपणे ढोलकी वाजवायला सुरुवात केली .तोंडानं हो हो करीत नवऱ्याने लेकरू काठीसकट उचललं. काठीचं टोक तोंडात धरून पोर तोलून धरलं .परत झेललं, परत सोडलं .नेहमी निरागस हसणार त्यांचं बाळ ना हसलं ना रडलं.उन्हात तांबडालाल होत जाणारा त्याचा चेहरा पाहून तिला वाटलं ढोलकीवर फिरणारा काठीचा आसूड आपल्या काळजावर फिरतोय .लोकांनी टाळ्या वाजवतात ती भानावर आली ढोलक खाली ठेवलं .नवऱ्याच्या हातून काठी घेतली .हळूवारपणे तिने काठी वरून पोर सोडवलं आणि पुन्हा झोळीत ठेवलं .त्याला खाली ठेवताना त्याच्या गालावरून आपला खडबडीत हात फिरवताना पोरांना डोळे उघडून एकदा तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा डोळे मिटून घेतले .झोळी झाडाखाली ठेवून तिन हातात थाळी हातात घेतली आणि मैदानाजवळ च्या प्रत्येक घरासमोर उभा राहत आवाज करू लागली.थाळीत पडणाऱ्या नाण्यांच्या छनछन आवाजाने तिच्या आशा पालवल्या गेल्या.

    माडीवरच्या बाईने आपल्या आजारी पोराचा अंगातल्या सदरा त्याच्यावरून वाळून टाकून तिला दिला ,तो तिनं आनंदाने घेतला .माय भाकर तुकडा नगं,पैक॔ दे असं म्हणून तिला विनवलं. आणि तिने बाळा वरून वाळून टाकलेले पैसे थाळीत पडताचआला बला करत तुझ्या लेकराला आराम पडू दे इडा पिडा टळू दे.असा भरघोस आशीर्वाद दिला.

    आता चार वाजत आले , आये, म्या भाकर खाऊ ,असं विचारत असलेल्या लेकाला तिनं सगळा भाकरतुकडा दिला. आणि ती झाडाखाली बसून अधाशासारखी नाणी मोजत राहिली.अकरा रुपये भरले तशी तिने समाधानाचा निश्वास सोडला. तिने ते पैसे पदरात बांधले. भाकरी खाणाऱ्या लेकराला आता उरलेले रस्त्यात खा पोरा नाहीतर डागटर घावणार नाही, असं म्हणत त्याला तसंच उठवलं. झोळी काखोटीला मारली आणि ती झपाट्याने वस्तीकडं चालू लागली .दुपारची उन्ह थोडी सौम्य झाली होती . तिच्या डोळ्यात चांदणं फुल होतं ,तिच्या डोळ्यासमोर क***** टपोऱ्या डोळ्याचं खळाळून हसणार आपलं लेकरू तरळत होतं.पालाजवळ येताच तिनं नवऱ्याला ढोल काट्या आत ठेवण्यास बजावलं. आणि काखोटीला मारलेली पोराची झोळी आणि पैसे बांधलेला पदर हातात धरून डॉक्टरकडे धूम ठोकली .डॉक्टर कोणालातरी तपासत होता .तिला तेवढाही दम धरवला नाही .ती वेगाने आत शिरली. त्याच्या समोर उभी राहात पदरातली नाणी त्याच्या समोर धरत ती अजीजीने म्हणाली,"

    "डागदर बेगीन सुई ठोपा माझ्या लेकाला.

    चार दिस झालं.निपचित पडलयं तापानं.

    पैक आणल्यात म्या.नगद अकरा रूपये.सगळं घ्या पन सुई ठोपा माज्या

    लेकराला.माज लेकरू हसू,रडू द्या ."

    डॉक्टरने तिला तिच्या लेकाला मांडीवर घ्यायला सांगितले , तेंव्हा कुठे तिच्या लक्षात आलं ,अजून आपल्या लेकराची झोळी आपल्या काखोटीला आहे. पततिने तिथेच जमिनीवर बसकण मारली. लगबगीने झोळीतून पोराला मांडीवर घेतलं .डॉक्टरचं पूर्वीच्या पेशंटला तपासून झालं होतं .त्यानं पोराच्या कपाळावर हात ठेवला आणि झटक्यात मागे घेतला .तो तिकडे पाहत मान हलवीत राहिला .त्याच्याकडे न पहाताच चैती सांगतच राहिली ,पदरातील बांधलेली नाणी तीने जमिनीवर ओतली.

    बोलता-बोलता भावनातिरेकाने तिनं लेकाच्या गालावरून हात फिरवला आणि त्याचा गारेगार स्पर्श तिचं काळीज कापत गेला .तिचं लेकरू उपचारापलीकडं केव्हांच पोचलं होतं .चैतीने फोडलेल्या हंबरड्याने तो माळ त्याच्या पाला सकट हादरला. पोराला मांडीवर घेऊन ती रडत राहिली ,आक्रोशत राहिली. पोराला तिच्यापासून कोणी अलग केलं ,तेव्हा ती दूरवर धावत सुटली दिशाहीन.

    तेव्हापासून चैती रोजच उन्हाच्या रखात सुसाटत मैदानावर येते .अंगावर तेच चिंध्या झालेलं लुगडं ,कळाहीन चेहरा,केसाच्या जटा झालेल्या.तिच्या हातात एक लांब बांबू असतो आणि बांबूच्या टोकाशी असतं चिंध्याच गाठोडं. तो बांबू उंच धरत ती बोलत राहते.ती ओरडत राहते," ओ,माडी वरले बाय- पोरांनु सगळ्जणं या डोंबाऱ्याचा खेळ पघा ,आवडलं तर पैकं द्या .तिच्या हाकांना कोणीच उत्तर देत नाही .ती घारीसारखी त्या मैदानावर इकडून तिकडे इकडून तिकडे भिरभिरत राहते .अजूनही तिच्या काखोटीला झोळी असते .झोळी ती अलगद झाडाखाली ठेवते आणि एका थाळीत दगड गोळा करून झाडाखाली बसते ,पैसे समजून मोजत राहते .काही वार्तय पोरं तिची टिंगल करतात .कधी एखादी दयाळू बाई तिला भाकरतुकडा घालते .आता तिचा मुलगा ,नवरा तिला सोडून केंव्हाच निघून गेलेत .त्या माळावरची पालं आता उठली आहेत. माळावर आता फक्त काटेरी निवडुंग उभा आहे .या माळावर निवडुंगाच्या सोबतीला चैती राहते.

    रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई



    Rekha Mirajkar


Your Rating
blank-star-rating
आसावरी वाईकर - (04 December 2020) 5
लेखन खूप सुंदर.. आणि त्याचा प्रभाव असा की अस्वस्थता खोलवर झिरपत जात आपणही जगण्याचे अर्थ पुन्हा तपासून पाहू लागतो...

0 0

Seema Puranik - (03 December 2020) 5
हृदय विदारक 😥😪

0 0

राजीवलोचन पुंडलीक - (03 December 2020) 5
गलबलून आलं !हे असंच आजही कायम सुरु आहे...! एक उत्कृष्ट कथा !

1 0

ऋचा दीपक कर्पे - (03 December 2020) 5
......खूपच विदारक चित्र

0 0